रील टू रिअल!! मालिका विश्वातील लोकप्रिय जोडीचा धुमधडाक्यात साखरपुडा; फोटो झाले व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजसृष्टीत सध्या लग्नाचं वारं आलंय. अलीकडेच अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी लग्नगाठ बांधली. शिवाय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णीदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायनदेखील लवकरच सात फेरे घेणार आहेत. याच लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप साखरपुडा उरकल्याची बातमी अजूनही अनेकांना पचलेली नाही. अशातच आता ऑनस्क्रीन लोकप्रिय असलेली जोडी आता ऑफस्क्रीन लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या लोकप्रिय मालिकेतील वृंदा- राणा म्हणजेच अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे हे केवळ ऑनस्क्रीन नव्हे तर ऑफस्क्रीन देखील प्रेमात आहेत. लवकरच अमृता आणि शुभंकर खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकणार आहेत.

नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला आणि या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेता संग्राम साळवीने आणि अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या जोडप्याच्या साखरपुडा सोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या साखरपुड्यासाठी अमृता आणि शुभंकरने पारंपारिक लूक केला होता. अमृताने हिरव्या रंगाची साडी तर शुभंकरने पिस्ता रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दरम्यान ‘कन्यादान’ मालिकेत अमृता बने ही वृंदाचे तर शुभंकर एकबोटे राणा हे पात्र साकारत आहेत.

याच मालिकेच्या सेटवर अमृता आणि शुभंकर यांची पहिली भेट झाली. पुढे सहकलाकार म्हणून मैत्री झाली, बोलणं वाढलं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवस डेटिंग केल्यानंतर आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला असून नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख समोर येणार आहे.