काय कमाल आहे ना बायकांची..? ‘झिम्मा 2’च्या लेडी गँगसाठी सिद्धार्थ चांदेकरची स्पेशल पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळे थिएटर अगदी झिम्मामय झाले आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अगदी धुमाकूळ घालतो आहे. २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकचं नव्हे तर समीक्षकांचेही प्रेम मिळवले आहे. चित्रपटातील सात बायकांच्या रियुनियनची ही हृदयस्पर्शी गोष्ट सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान या चित्रपटातील त्या सात अभिनेत्रींसाठी त्यांच्याबरोबर चित्रपटात काम करणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

तर ‘झिम्मा २’च्या कबीरने म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू या अभिनेत्रींनसाठी ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने शूटिंगदरम्यान काढलेले या अभिनेत्रींचे Unseen फोटो शेअर केले आहेत. सोबत लिहिलंय, ‘काय कमाल आहे ना बायकांची..? एवढं हसायला आणि हसवायला शिकतात कुठून..? मनापासून प्रेम करायला, मनापासून काळजी घ्यायला, मनापासून जगायला ते ”मन” किती शक्तिशाली असेल याची कल्पना करणं सुद्धा अवघडच’.

‘संकटाच्या, दुःखाच्या काळात डोळ्यात डोळे घालून शांतपणे हसून बघायला काय ताकद लागत असेल आणि एवढं असून सुद्धा लहान बाळासारखं हट्ट करायला पण मागे पुढे बघत नाहीत. अजब आहात तुम्ही खरंच… काय कमाल आहे ना बायकांची..? यांचं सौंदर्य एका फोटोत कधीच दाखवता यायचं नाही… त्यांचं हास्य दाखवण्याचा हा माझा बारीक प्रयत्न’. सिद्धार्थने या पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोंमध्ये या प्रत्येक अभिनेत्रीचा हसरा चेहरा आपल्याला पहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये खरंच प्रत्येकीचा निरागसपणा त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसतोय. त्यामुळे सिद्धार्थची हि पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.