‘माझ्या भीमानं लावली, शिक्षणाची हळद मला…’; ‘महापरिनिर्वाण दिना’निमित्त हेमांगीने शेअर केलं खास गाणं


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या ६ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली जाते. सालाबादप्रमाणे यंदाही आंबेडकरांना आदरांजली देण्यासाठी लाखो अनुयायी एकवटताना दिसणार आहेत. अशातच महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या चित्रपटातील एक गाणं शेअर केलं आहे. या गाण्याचे शब्द आणि संगीत हे आंबेडकरांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळेल अशी आशा आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेकदा वेगवेगळे फोटो, व्हिडीओ, किस्से, अनुभव आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती ती या माध्यमातून देताना दिसते. नुकतेच तिने आगामी चित्रपट ‘तिचं शहर होणं’मधील एक खास गाणं शेअर केलं आहे. या गाण्यात पवार आणि कांबळे अशा दोन कुटुंबात हळदीचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसत आहे. यावेळी बॅकग्राऊंडला ‘माझ्या भीमानं लावली, शिक्षणाची हळद मला…’ असे बोल असणारे गाणे ऐकू येत आहे.

अभिनेत्री हेमांगीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘हा चित्रपट, हे पात्र, मला खूप अभिमान आहे! रस्सा मला ‘मीना’ दिल्याबद्दल धन्यवाद!! रस्सा, काय गाणं लिहीलंयस गं! #जयभीम. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आमच्या ”तिचं शहर होणं” चित्रपटातील हे गाणे तुमच्या भेटीस आणत आहोत. माझ्या भीमानं लावली, शिक्षणाची हळद मला…’ हे गाणं रसिका आगाशेने लिहिलं असुन राहूल रानडेने संगीतबद्ध केलं आहे. तर नंदेश उमप यांनी हे गाणं गायलं आहे.