‘ज्युबिली’ वेबसिरीजची कथा चोरीची..? कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवत मराठी लेखकाकडून मोठा आरोप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आंदोलन फिल्म्स, फॅंटम स्टुडिओ आणि रिलायन्स एंटरटेनमेंट निर्मित, विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘ज्युबिली’ ही वेबसीरिज ३ एप्रिल २०२३ रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरीज रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता एका मराठी दिग्दर्शकाने या सिरीजची कथा आपली असल्याचा दावा करत सीरिजच्या निर्मात्यांवर कथा चोरीचा गंभीर आरोप केला आहे. या दिग्दर्शकाचे नाव नागनाथ खरात असून या प्रकरणी सीरिजच्या लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकानं त्यांनी कायदेशीर कारवाई संदर्भात नोटीस पाठवली आहे.

नागनाथ खरात हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी २०१७ साली चित्रपट निर्मितीमध्ये पहिला प्रयोग केला. त्यांच्या कलाकृती अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये विविध विभागात निवडल्या गेल्या होत्या. पुढे २०१८ साली लेखकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सिनेस्तान या संहिता लेखनाच्या स्पर्धेत ते सहभागी झाले होते आणि यासाठी त्यांनी ‘बरसात की रात’ ही सिनेकथा पाठवली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या लेखकांच्या संहिता थेट निर्मात्यांपर्यंत पोहोचत होत्या आणि यातूनच आपली कथा चोरली असल्याचा दावा नागनाथ यांनी केला आहे.

दिग्दर्शक नागनाथ खरात यांनी म्हटलं, ‘ही कथा माझी असताना कोणत्यातरी भलत्याच लेखकाच्या नावावर खपवून त्याची वेबसीरिज तयार करण्यात आली आहे. ‘ज्युबिली’ आणि ‘बरसात की रात’ या दोन्ही कथांमधील पात्र, प्रसंग आणि यातील घटनांमध्ये विशेष साम्य आहे. तसेच चित्रपटाच्या कथेचे रूपांतर वेबसीरिजमध्ये करण्यासाठी त्याच्या काही प्रसंगांमध्ये वाढ केली आहे. या संदर्भात मी स्क्रीन राइटर्स असोसिएशनकडे तक्रार केली होती. वारंवार त्या तक्रारीचा पाठपुरावा केल्यानंतरही संस्थेकडून कोणतीही दाद मिळाली नाही. संस्थेतील अधिकारी हे प्रकरण त्यांच्या वकिलांकडे पाठवतो, असे म्हणाले खरे. मात्र, पुढे काहीच न करता टाळाटाळ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणून या प्रकरणी वेबसीरिजचे लेखक, निर्माते, दिग्दर्शकांना कायदेशीर कारवाई संदर्भात नोटीस पाठवली आहे’. दरम्यान नागनाथ यांनी वेबसीरिजचे लेखक अतुल सबरवाल, अॅमेझॉन प्राइम आणि दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांना नोटीस बजावत ५ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा केल्याचे सांगितले आहे.