‘त्याच्यासाठी प्रार्थना करा..’; कॅन्सरग्रस्त ज्युनिअर मेहमूद यांची ‘ती’ इच्छा पूर्ण केल्यानंतर सचिन पिळगांवकरांची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर हे कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. आताही ते एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते ज्युनियर मेहमूद हे यकृत आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाशी दोन हात करत आहेत. नोव्हेंबरमध्ये त्यांना कॅन्सरचे निदान झाले आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अशा अवस्थेत ज्युनियर मेहमूद यांनी आपल्या बालपणीचे मित्र सचिन त्यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा सचिन यांनी पूर्ण केली आहे.

चित्रपट निर्माते खालिद महमूद यांनी एक्स ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिलंय कि, ‘ज्युनियर मेहमूद एकेकाळचे बाल- कलाकार कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यात आहेत. त्याने जितेंद्र यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांना त्यांचे लहानपणीचे मित्र सचिन पिळगावकर यांनाही भेटायचं आहे. कृपया जितेंद्र साहेब व सचिनजी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करा’. या पोस्टला श्रिया पिळगांवकरने उत्तर देताना सांगितले कि, सचिन यांनी मंगळवारी मेहमूद यांची भेट घेतली.

या रिप्लाय ट्विटमध्ये श्रियाने म्हटले कि, ‘बाबा त्यांच्या संपर्कात आहेत आणि आज त्यांची भेट घेतली’. याशिवाय सचिन पिळगांवकर यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले, ‘माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, माझा बालपणीचा मित्र ज्युनियर मेहमुद एका जीवघेण्या आजाराने त्रस्त आहे, कृपया त्याच्यासाठी प्रार्थना करा. मी काही दिवसांपूर्वी त्याच्याशी व्हिडिओ संभाषण केले होते आणि आज त्याला भेटायला गेलो होतो. पण त्याच्यावर उपचार सुरु होते. मी त्याचा मुलगा आणि जॉनी लीव्हर यांच्यासोबत त्याच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यासाठी संपर्कात आहे. देव त्याला आशीर्वाद देवो!!’ सचिन पिळगांवकर आणि ज्युनियर मेहमूद यांनी नव्वदीच्या काळात बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘बचपन’, ‘गीत गाता चल’, ‘ब्रह्मचारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं.