हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट उद्या शुक्रवारी ८ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कारण या चित्रपटाची स्टारकास्ट फारच भन्नाट आहे. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, भाऊ कदम, सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी या विनोदवीरांचा यात समावेश आहे. दिग्दर्शक म्हणून प्रसादचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे नम्रताने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री नम्रता संभेरावने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर प्रसादसोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करुन नम्रताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘फाल्गुन अश्विनी.. उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस, तू दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा प्रदर्शित होतोय, तुझं अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण होतंय, तुला खूप शुभेच्छा पश्या. कमाल झालाय सिनेमा, पहिला चित्रपट जर असा असेल तर इथून पुढचे सगळे चित्रपट तू असेच यशस्वीरीत्या दिग्दर्शित करशील ह्याची खात्री आहे मला, त्याची मी साक्षीदार आहे ह्याचा अतोनात आनंद होतोय, असंच passionately काम करत रहा’.
पुढे लिहिलंय, ‘तुझ्यातली सकारात्मक ऊर्जा खूप शिकवून जाते नेहमीच, असाच रहा खूप मोठा हो, चित्रपट दिग्दर्शकांच्या फळीत आता तुझंही नाव लागणार, खूप अभिमान वाटतोय तुझा तुला पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा पश्या!! ८ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला नक्की जा.. बुक माय शोवर tickets available आहेत. लवकरात लवकर तिकिट्स बुक करा आणि एक धमाल laughter ride अनुभवा’. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रसादने केलं असुन तो स्वतःदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.