‘हिंदी सिनेमाच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट Housefull..’; सुबोध भावेची Insta स्टोरी व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफीसवर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये चांगली चुरस पहायला मिळते आहे. एकीकडे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ हा सिनेमा तगडी टक्कर देतोय. हे दोन्ही सिनेमी तुफान कमाई करत असताना हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला करताना दिसतो आहे. दोन बिग बजेट बॉलिवूड सिनेमांना एकटा ‘झिम्मा २’ भिडतोय. याविषयी अभिनेता सुबोध भावेने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर फार सक्रिय असतो आणि याच माध्यमातून तो वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसतो. हि पोस्टदेखील त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने ‘झिम्मा 2’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे आणि त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आजूबाजूच्या हिंदी सिनेमाच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट housefull गर्दीत चालू आहे याचा प्रचंड आनंद. रसिक प्रेक्षकांना धन्यवाद आणि धमाल चित्रपट दिल्याबद्दल… झिम्मा 2 संघाचे खूप कौतूक’.

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे या अभिनेत्रींसोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरदेखील महत्वाच्या भूमिकेत आहे. या बायकांच्या रियुनियनची गोष्ट अत्यंत सुंदररित्या गुंफण्यात आली असून चित्रपटातील गाणीदेखील प्रेक्षकांना भावली आहेत.