‘आता खुर्ची आपलीच हाय..’; बिग बॉस फेम राकेश बापट आणि अक्षय वाघमारे झळकणार एकाच चित्रपटात


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून ‘खुर्ची’ या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. ‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी..’ असा दमदार संवादाने सुरु होणारा या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर फार गाजला. पण नेमकं सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार..? असा प्रश्न अजूनही कायम आहे.

येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी ‘खुर्ची’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सत्तेसाठी आणि खुर्चीच्या पावरसाठी खून, मारामाऱ्या आणि रक्त सांडणाऱ्या मानसिकतेवर आधारलेला हा चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. टीझरमध्ये राकेश बापट, अक्षय वाघमारे आणि बालकलाकार आर्यन हगवणे यांच्या झलक दिसल्या आहेत.

मालिका विश्व ते बिग बॉस हिंदीमधून प्रेक्षकांच्या मनात पक्की जागा निर्माण करणारा अभिनेता राकेश बापट या चित्रपटाबाबत बोलताना म्हणाला, ‘नुकताच चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझर पाहून तुम्हाला कल्पना आली असेल की नक्की आम्ही काय व कशा प्रकारचा राडा घातला आहे. एकूणच चित्रपट करताना खूप मज्जा आली’. तर अभिनेता अक्षय वाघमारेने चित्रपटाबाबत सांगितले कि, ‘चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची झालेली हवा पाहून मी अचंबित झालो आहे’.