अर्जुनमुळे मधुभाऊंना न्याय मिळणार; खऱ्या आरोपीचा चेहरा समोर येणार..? नवा प्रोमो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका आता पुन्हा एकदा रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट कायम चर्चेचा विषय ठरतात. तसेच यावेळीदेखील हा नवा ट्विस्ट मालिकेला रंगत आणून प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे. लवकरच मालिकेचा नायक अर्जुन हा सायलीच्या वडिलांना म्हणजेच मधुभाऊंना एका खोट्या आरोपातून बाहेर काढताना दिसणार आहे. सायलीच्या एका खुलाशामुळे अर्जुनला मधुभाऊंच्या केसमध्ये मोठा पुरावा मिळाला आहे. ज्यामुळे आता तो मधुभाऊंची खोट्या गुन्ह्यातून सुटका करणार आहे.

मधुभाऊ हे सायलीचे खरे वडील नसले तरीही तिला लहानाचं मोठं केल्यामुळे त्यांच्यासोबत तिचं लेकीसारखं नातं आहे. त्यामुळे त्यांच्यावरील खोटा आरोप सिद्ध करायला सायलीने अर्जुनशी लग्न केलं होतं. त्याच झालं असं कि, सायलीचं बालपण एका अनाथ आश्रमात गेलं. लहानपणी एका अपघातात तिची आई – वडिलांपासून ताटातूट झाली. यामुळे आश्रमात मधुभाऊंनी तिचा संभाळ केला. पण या आश्रमाची जमीन हडपून त्यावर इमारत बांधण्यात यावी यासाठी अनेक बिल्डर या जमिनीवर डोळा ठेवून होते. यातील एक म्हणजे साक्षी शिखरे. जिने आश्रमात एक खून घडवून आणला आणि याचा आरोप मधुभाऊंवर टाकला.

या खोट्या आरोपातून त्यांना बाहेर काढण्यासाठीच सायलीने अर्जुनची मदत घेतली आणि या दरम्यान एका विचित्र परिस्थितीमुळे त्यांना लग्न करावं लागलं. यानंतर अखेर आता अर्जुन मधुभाऊंना यातून सोडवून सायलीचं मन जिंकणार आहे. केसचा तपास करताना सायली अर्जुनला सांगते कि, मधुभाऊ उजव्या हाताने बंदूक उचलून गोळी झाडू शकत नाहीत कारण त्यांच्या उजव्या हातात तितकी शक्तीच नाही. मधुभाऊ डावरे असून त्यांची रोजची कामंदेखील ते डाव्या हाताने करतात. यावरून साक्षी शिखरे आणि प्रियाचा जबाब खोटा असल्याचे समोर येणार आहे. म्हणजेच खुनावेळी केवळ मधुभाऊ नव्हे तर, त्या ठिकाणी आणखी एक व्यक्ती उभी होती आणि त्याच व्यक्तीने खून केल्याचा निष्कर्ष अर्जुनने लावला आहे. यानुसार अर्जुन कोर्टात साक्षी शिखरेची उलट तपासणी घेत त्यांचा खोटेपणा आणि सत्य उघड करणार आहे.