‘जाऊ बाई गावात’मध्ये देवदत्त नागेसोबत बैलगाडा शर्यत रंगणार; कोणती स्पर्धक बाजी मारणार..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच झी मराठीवरील सुरु झालेला ‘जाऊ बाई गावात’ हा शो सध्या चांगलाच रंगात आला आहे. या शोचा होस्ट प्रेक्षकांचा लाडका राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आहे. त्यामुळे या शोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. अत्यंत वेगळी आणि भन्नाट संकल्पना असलेला हा नवा रिअ‍ॅलिटी शो ४ डिसेंबर २०२३ रोजी सुरु झाला. यामध्ये श्रीमंत आणि शहरात वाढलेल्या मुलींना गावातील आयुष्य जगण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. हार्दिक आधीच त्याच्या रांगड्या अंदाजाने शोमध्ये दम भरताना दिसतोय. यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याची खास टास्कसाठी शोमध्ये एंट्री होणार आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या ‘जय मल्हार’ या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता देवदत्त नागे आता ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात धमाकेदार एंट्री घेणार आहे. ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मन आधीच जिंकली आहेत. शिवाय मस्त संकल्पनेला राणा दाच्या रांगड्या अंदाजाची साथ आहेच आणि आता जबरदस्त तडका घेऊन एक धमाकेदार टास्क द्यायला नवा पाहुणा म्हणून देवदत्त नागेची एंट्री झाली आहे. अभिनेता देवदत्त नागेच्या एंट्रीचा एक प्रोमो नुकताच समोर आला असून चांगलाच व्हायरल होत आहे.

झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीलाच अभिनेता देवदत्त नागे घोड्यावर बसून येताना दिसतोय. त्यानंतर आता कार्यक्रमात बैलगाडा शर्यत रंगणार असल्याचे समोर आले आहे. या जबरदस्त टास्कमध्ये कोणती स्पर्धक बाजी मारणार…? हे तर कार्यक्रम पाहिल्यावरच समजेल. त्याचसोबत आठवड्याच्या शेवटी या कार्यक्रमाचे पहिलं एलिमिनेशन होणार आहे. त्यामुळे पहिल्याच टास्कमधली विजेती आणि खेळातून बाद होणारी ती शहरी मुलगी कोण असेल..? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.