लैंगिकतेचे राजकारण भयाण!! अभिनेत्याचा राजकारण्यांवर संताप; म्हणाला, ‘तुमची राजकीय चिखलफेक..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सुव्रत जोशी हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्यामुळे विविध पोस्ट शेअर करत तो व्यक्त होतो आणि चाहत्यांच्या संपर्कात राहतो. स्पष्टवक्तेपणासाठीदेखील सुव्रत ओळखला जातो आणि याच स्वभावानुसार त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. जी कुणाला कटू वाटली तरीही सत्य आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुव्रतने या पोस्टमधून तृतीयपंथियांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल, शोषणाबद्दल राजकीय नेत्यांवर परखडपणे टीका केली आहे.

सुव्रतने फेसबुकवर एक पोस्ट रिपोस्ट केली आहे. यात लिहिलंय, ‘उठसूठ कोणीही पुरुष स्वतःच्या वागण्यातल्या पितृसत्तेकडे दुर्लक्ष करत दुसऱ्या पुरुषाला “नामर्द” ठरवत “हिजडा ” म्हणतो आणि हे दाखवून देतो की स्त्रिया, तृतीयपंथी, समलिंगी, पारलिंगी ह्यांचं आयुष्य, अस्तित्व अर्थहीन, दुर्बल आणि लज्जास्पद आहे, जेणेकरून त्यांना दिलेला शब्दही एक शिवी ठरू शकतो. हे सारखंच घडत असतं. मुलं, पुरुष सतत इतके बेमालूमपणे भाषेच्या अशा वापरातून पितृसत्ताक संस्कृती दाखवत राहतात. परंतु समाजातील आणि समाजाच्या भाषेतील ह्या अदृश्य व्यक्ती जेव्हा खरंच रस्त्यावर उतरतात, नेत्यांना, यंत्रणेला जाब विचारतात, “तुम्हा पुरुषांच्या घाणेरड्या राजकीय भांडणात म्या गरीबाचा का म्हणून अपमान करताय, आधीच काय कमी शोषण होतंय का?” तेव्हा ती एक क्रांती असते. भाषा ही सत्ताधाऱ्यांची गुलाम असं मानणाऱ्या लोकांना समतेचं व्याकरण शिकवावं लागेल. अदृश्य व्यक्तींना समोर यावं लागेल. शिव्यांमधून शब्दांना सोडवावं लागेल, शिव्यांमधुन जिवंत माणसांचा स्वाभिमान सोडवावा लागेल’.

गेले दोन दिवस, अशाच एका हिजड्याला, निर्भिडपणे त्याच्या दृश्यमानतेसाठी लढताना पाहिलं. तिच्या आजूबाजूला मग जमा झाले, पाठिंबा देणारे पक्ष, कार्यकर्ते, संस्था. सगळ्यांचे आपापले मनसुबे. पण शेवटी हा संघर्ष तिचा एकटीचाच. आणि ह्या प्रवासाचा मार्ग पुढे भरपूर लांब जातो हेही दिसतंय. काल दमली होती बिचारी संध्याकाळपर्यंत, पण तरीही संविधानावर असलेला तिचा विश्वास दमला नव्हता. ह्या लोकशाही, संविधान मानणाऱ्या देशाकडून असलेली अपेक्षा पूर्ण नाहीच झाली. निराशाच पडली पदरी. मात्र तिनं कहर केला. एकटा माणूस, वंचितातला वंचित असला तरी, उभा राहू शकतो, स्वतःच्या अधिकारांसाठी, समतेसाठी. पुढे कसं जायचं माहीत नसलं तरी बसून होती, रस्त्यावर रात्रभर. काल तिने अनेक मागून आलेल्या lgbt तरुणांना एक आदर्श जगून दाखवला. तिने दाखवून दिलं की लैंगिकतेचे राजकारण किती भयाण आहे आणि त्या आगीत उतरायला हिंमत लागेल. हा संघर्ष अटळ आहे, आणि तो पुढे नेऊच. तत्पूर्वी ही क्रांती सुरू करणाऱ्या तुला खूप प्रेम आणि सलाम’.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सुव्रतने म्हटलंय, ‘तुमची राजकीय चिखलफेक चालू देत, तुमच्या कुणाकडूनही काही विधायक, प्रबोधनपर असे अपेक्षित नाहीच. आता कुणाविषयी प्रेम अथवा आदरदेखील वाटत नाही परंतु आपापसात भांडताना वर्षानुवर्षे ज्या बुरसटलेल्या धारणांनी समाजातील एका गटाला वंचित ठेवले, त्यांचे पिडन केले, किमान त्या धारणा बळकट होणार नाहीत, काही छुपे चुकीचे संदेश जाणार नाहीत ही काळजी तरी घ्या’. सुव्रतने शेअर केलेली हि पोस्ट हळूहळू सोशल मिडीयावर व्हायरल होत असून प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे.