मराठमोळ्या अभिनेत्रीने महाबळेश्वरमध्ये फुलवलाय लालबुंद स्ट्रॉबेरीचा मळा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे कामानिमित्त मुंबईत राहत असले तरी त्यांची मूळ घरं दुसरीकडे आहेत. निसर्गाच्या कुशीत आणि शांत वातावरणात रहायला कुणाला आवडत नाही..? म्हणूनच तर अनेक कलाकार मंडळींनी ठिकठिकाणी फार्महाऊस बांधले वा खरेदी केले आहेत. काहींनी व्यवसायाच्या दृष्टीने तर काहींनी निवांतपणाच्या दृष्टीने अशी घर खरेदी केली आहेत. यांपैकी एक म्हणजे मृण्मयी देशपांडे. मुंबई सोडून महाबळेश्वरमध्ये तिने नवऱ्यासोबत सुखी संसार सुरु केला आहे. इतकंच नाही तर दोघे मिळून छान स्ट्रॉबेरीची देखील लागवड करत आहेत.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केलंय. पण कमाइतकीची ती वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत येत असते. मृण्मयी आणि तिचा नवरा स्वप्नील २०२० पासून महाबळेश्वरमध्ये राहत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात या जोडप्याने सुंदर आलिशान घर बांधलं आहे. या ठिकाणी त्यांनी ‘नील अँड मोमो फार्म’ नावाचा व्यवसाय सुरू केलाय. ज्यामध्ये ते दोघे शेतात कसून नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देताना दिसत आहेत. त्यांच्या शेतातील काही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. जे तुफान व्हायरल झाले आहेत.

मृण्मयी आणि स्वप्नील शेतीबरोबरच नैसर्गिक साबणांची निर्मिती सुद्धा करतात. एक व्हिडीओ शेअर करत मृण्मयीने स्ट्रॉबेरी लागवडीची माहिती दिली आहे. सुरुवातीला या स्ट्रॉबेरीजची विक्री केवळ पुण्यात केली जाईल अशीही माहिती तिने यामध्ये दिली आहे. आता थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात बाजारात येताना दिसतात. त्यामुळे यंदा बाजारात मृण्मयी आणि स्वप्निलच्या कष्टाचे फळदेखील विक्रीसाठी येणार आहे. त्यामुळे मृण्मयीने ‘आमच्या नैसर्गिक स्ट्रॉबेरीज नक्की विकत घ्या’, असे आवाहन चाहत्यांना केले आहे.