नियतीनेच पत्ते पिसले तर..? ‘सूर नवा ध्यास नवा’मधून समीर परांजपे बाहेर; भावुक होत म्हणाला, ‘हावरटासारखं गाणं..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ हे नवं पर्व सध्या सुरू आहे. यामध्ये ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता समीर परांजपे सहभागी झाला होता. आपल्या आवाजाने सर्वांची मन जिंकणाऱ्या समीरचा या स्पर्धेतील प्रवास नुकताच संपला आहे. त्याच्यासोबत श्रृती जयदेखील स्पर्धेतून बाहेर पडली. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर समीरने एक भलीमोठी भावनिक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे आभार मानले आहेत.

अभिनेता समीर परांजपेने या सुरेल प्रवासाचे काही फोटो शेअर करत लिहिलंय, ‘आयुष्यात एखादी प्रिय गोष्ट काही कारणांनी करायची राहून गेली की ती राहूनच जाते म्हणतात आणि फक्त दिवसेंदिवस आपल्यातलं आणि त्या गोष्टीतलं अंतर वाढत राहतं. आपण असहाय्यपणे फक्त बघत राहतो हळहळत राहतो… कट्ट्यावर वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे २- ४ मित्रांच्या टोळक्यात आपल्या गुरूने दिलेल्या शिदोरीवर पोसलेल्या कलेची चमक दाखवून वाह वाह मिळवत राहतो आणि अरे लेका तू हे seriously करायला हवं होतंस, नाव काढलं असतंस, हे ऐकून उगाचंच खूश होत राहतो. हे सगळं मी ही अनुभवलं आहे. पण अशीच एखादी राहून गेलेली गोष्ट फिरून परत आली तर..? त्यावेळी राहून गेलं होतं काही कारणांनी म्हणतोस ना चल आता संधी आहे आता काय कारण देतोस बोल असे नियतीनेच पत्ते पिसले तर..?? मी ही तेच केलं.. हावरटा सारखं गाणं जगून घेतलं’.

‘सूर नवा ध्यास नवाच्या निमित्ताने पुन्हा गाणं करण्याची संधी मला दिलीत यासाठी सर्वप्रथम कलर्स मराठीचे खूप आभार. कलर्स मराठीची सगळी टीम तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे मी गाऊ शकलो. एकविरा प्रोडक्शनची सगळी टीम तुमचे ही खूप आभार फार मजा आली. आमचे mentors संपदा बांदोडकर, चिंतामणी सोहोनी तुमचे विशेष आभार.. सीन बसवण्याची सवय असलेल्या मला गाणं कसं बसवायचं हे तुम्ही शिकवलंत. आमचे सगळे म्युझिशिअन आणि त्यांचे कॅप्टन मिथिलेश पाटणकर दादा तुम्ही वेळोवेळी केलेल्या सूचना आणि तू मस्त गा ऐनवेळी काही झालंच तर “कॅच” पकडायला आहोत तुम्ही या दिलेल्या विश्वासामुळे मी बिनधास्तपणे गाऊ शकलो. अजित परब दादा तुमच्याकडून काव्य/ कविता/ गाणं कसं वाचावं हे शिकायला मिळालं. चाल बसली आहे आता “शब्द गा” ही तुम्ही केलेली सूचना कायम लक्षात राहील आणि कायम मी तो प्रयत्न करेन’.

पुढे त्याने रसिका सुनीलविषयी म्हटलं, ‘रसिका सुनील तूही सूर नवाचा प्रवास माझ्यासारखाच “जगतीयेस”. बोल्ड बिनधास्त ब्युटीफुल आणि उत्तम अभिनेत्री मागची हळवी कलाकार मला कळली आणि खूप भावली. आपली मैत्री इथून सुरू झाली आहे ती अशीच राहील याची खात्री आहे. माझ्या सगळ्या स्पर्धक मित्रांनो तुमच्याकडून ही खूप गोष्टी शिकलो. तुम्ही सगळे कमाल आहात. गाते रहो…’.