‘हे दुर्दैवी आहे.. कोणीतरी जिंकेल, कोणीतरी हरेल’; ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ वादावर मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध चेहरा अभिनेता सौरभ गोखले आपल्या अभिनयाइतकाच स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी माऊली प्रॉडक्शन्स आणि अभिनेता शरद पोंक्षेंच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी शरद पोंक्षे यांच्यावर आपल्या नाटकाचं शीर्षक चोरल्याचा गंभीर आरोप लावला. हा वाद इतका वाढला कि थेट न्यायालयापर्यंत पोहोचला. अखेर आता या वादावर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ गोखले याने आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

एका नामवंत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता सौरभ गोखले म्हणाला कि, ‘एकतर मला हा वाद चालू झालेलाच माहित नव्हतं. कारण माझ्याकडे जेव्हा नाटक आलं. तेव्हा या सगळ्या गोष्टी घडायच्या होत्या किंवा त्या प्रोसेसमध्ये होत्या. त्यामुळे मला हे माहित होतं की, शरद दादांनी एका पॉइंटला हे नाटक करण बंद केलं होतं. भूमिकेसाठी सूट होत नसल्यामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वी नाटक बंद केलं. माझ्याकडे जेव्हा नाटक आलं तेव्हा मला वाटलं, आता त्या निर्मात्यांना पुन्हा सुरू करायचं आहे. त्यामुळे त्यांना नव्या कलाकारांची गरज आहे. त्यावेळी शरद दादांनी नाही सांगितलं होतं. पण त्यानंतरही तेही नाटक आलं जे ५० प्रयोगासाठी सुरू केलं’.

‘मग वाटलं, काहीतरी एक वेगळा अँगल आहे. पण मी तो विचार करत नाही. कारण मी त्या ऑरिजनल कलाकारांच्या संचामध्ये काम केलं नव्हत किंवा त्या नाटकाचा भाग नव्हतो. त्यामुळे या नाटकाकडे एक फ्रेश नाटक आणि फ्रेश भूमिका, एक नवीन दिग्दर्शक, नवीन प्रोडक्शन हाऊस, या दृष्टीकोनातून मी या नाटकाकडे बघितलं. त्यामुळे मी कधीही त्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी झालो नाही. त्या चर्चेमध्ये मी सहभागी झालो नाही आणि मला वाटतं, त्या लोकांमध्ये जे वाद झाले तो त्यांच्या वैयक्तिक वाद होता’.

या वादावर तुझी प्रतिक्रिया काय..? असे विचारले असता सौरभने म्हटले कि, ‘हे दुर्दैवी आहे. ज्या नाटकाने इतिहास रचला. कारण अतिशय कमी व्यावसायिक नाटकं आहेत की, ज्यांनी आठशे, सव्वा आठशेचा टप्पा पार केलाय. ती काय सोपी गोष्ट नाही. ते सुद्धा अशा पॉइंटनंतर पहिले काही वर्ष या नाटकावर बंदी असून मग न्यायालयाने ती बंदी उठवून त्यानंतर नाटक सुरू झालं. मग पुन्हा त्यानंतर भांडणं, मारामारी, राडे, जाळपोळ हे सगळं होऊन आठशे प्रयोग होणं. हे नाटकं इतकं अजरामर नाटकं, त्या ऑरिजनल संचाला करायला मिळालं होतं. शरद दादांसारख्या एका तुफान अभिनेत्याने एका पातळीवर नेऊन ठेवलं. प्रेक्षकांनी उचलून धरलं. पुढे जाऊन त्या नाटकाबद्दल, त्या कलाकृतीबद्दल अशा पद्धतीचे वाद होणं, हे मला वाटतं दुर्दैवी आहे’.

‘सगळ्यांच्या दृष्टीनेच दुर्दैवी आहे. त्यातलं कोणीतरी जिंकेल, कोणीतरी हरेल. मी म्हणणे की, त्याचा धड कोणाला फायदा होणार आहे, धड ना तोटा होणार आहे. पण नशीबाने त्या कॉन्टेंटला कधी धक्का लागणार नाही. जे प्रदीप दळवींना लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं, त्याला कधी धक्का लागणार नाही. पण यातला एक पॉइंट असा असू शकतो. याच्यातला धोका कधी, कधी हा असतो, जर हा वाद कुठल्या वेगळ्या अँगलने गेला आणि न्यायालयाने असं ठरवलं की, हा वाद सुटण्यासारखा नाहीये. मग आता ही कलाकृती कोणीच करायची नाही. म्हणजे जसं बरेच वेळेला टायटलच्या बाबतीत होतं. हे टायटल कोणी वापरायचं नाही किंवा हे चिन्ह कोणीच वापरायचं नाही. मग त्यावेळेला नुकसान होणार आहे. ते प्रेक्षकांचं होणार आहे. त्यामुळे हे दुर्दैवी आहे. पण त्याला काही करू शकत नाही’.