‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या परिक्षणाची जबाबदारी सलील कुलकर्णी आणि वैशाली माडेच्या खांद्यावर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचे नाव आवर्जून घेतले जाते. या कार्यक्रमाची अनेक पर्व येऊन गेली आणि प्रत्येक पर्वाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गेली अनेक वर्षं हा कार्यक्रम प्रेक्षकांना सुरेल दुनियेत घेऊन जात आहे. आता लवकरच या कार्यक्रमाचे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या कार्यक्रमाचे परीक्षण कोण करणार..? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर नव्या अपडेटनुसार आता परीक्षकांची नावे समोर आली आहे.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या आगामी पर्वाबाबत नव्याने आलेल्या अपडेटनुसार, हा कार्यक्रम येत्या ९ ऑगस्ट २०२३ पासून झी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. ‘सारेगमप’च्या आगामी पर्वाचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर आता या पर्वाचं परीक्षण कोण करणार हे जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक झाले आहेत. कारण ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या या पर्वाआधीच्या पर्वाचे परीक्षण आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांनी केले होते. त्यामुळे या पर्वाचे परीक्षण देखील हेच पाच जण करणार का.? अशी चर्चा रंगली आहे. आता प्रेक्षकांच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या आगामी पर्वाचं परीक्षण लोकप्रिय संगीत दिग्दर्शक आणि गायक सलील कुलकर्णी करणार आहेत. यांच्यासोबत बॉलीवूड संगीत विश्वातील आघाडीची मराठमोळी गायिका वैशाली भैसने- माडेदेखील आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

याशिवाय ‘सारेगमप’च्या या आगामी पर्वात सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत आपल्या भेटीस येणार आहे. ऑडिशनमधून सारेगमपचे परीक्षक अखंड महाराष्ट्रातून प्रेक्षकांना भावणारे सूर शोधून आणणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक हा नवीन कार्यक्रम कधी सुरू होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.