‘तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा..’; ‘धर्मवीर 2’च्या शूटिंग सेटवरील फोटो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक त्याच्या अभिनयाच्या जोरावर आघाडी पथावर आहे. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणूनदेखील त्याची चांगलीच हवा आहे. मधल्या काळात प्रसाद ओक दिग्दर्शित आणि अभिनित दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिस तुफान गाजवलं. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटात प्रसाद ओकने साकारलेले आनंद दिघे तर प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरून अजूनही जाईनात. अशातच आता ‘धर्मवीर’चा सिक्वल येऊ घातला आहे. ज्याच्या शुटिंग सेटवरील काही फोटो समोर आले आहेत.

‘धर्मवीर 2’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता बळावली आहे. हा चित्रपट आनंद दिघेंच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे दर्शवणार आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निर्माते मंगेश देसाई यांनी ‘धर्मवीर २’च्या सेटवरील काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये प्रसाद ओक पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या वेशभूषेत दिसत आहे. हे फोटो शेयर करत मंगेश यांनी लिहिलं, ‘असा हा ”धर्मवीर”…. तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा!!’

‘ ”धर्मवीर”च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा आणि ”साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” उलगडून सांगणारा मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ”धर्मवीर – २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” या चित्रपटाच्या मुहूर्तानंतर आज चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे. लवकरच अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभराला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यामुळे सज्ज व्हा, धर्मवीर पुन्हा येतायत आपल्या भेटीला…!!’ मंगेश देसाईंची हि पोस्ट व्हायरल झाली असून येत्या वर्षी २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.