हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मराठी कलाकार केवळ मराठी कलाविश्वापुरता मर्यादित राहिलेले नाहीत. तर मराठीशिवाय बॉलिवूड ते टॉलिवूडपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. यामध्ये सयाजी शिंदे, नाना पाटेकर, सई ताम्हणकर, उपेंद्र लिमये, अमृता खानविलकर, अमेय वाघ, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, गिरीजा ओक, क्षिती जोग अशा बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे. यातच आता बिग बॉस मराठीतून प्रसिद्धी झोतात आलेला ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.
गेल्या काही अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवूड सिनेविश्वात दमदार कामगिरी केल्याचे आपण पाहिले आहे. सध्या मराठी अभिनेता उपेंद्र लिमयेंच्या ‘अॅनिमल’मधील कॅमिओ रोलची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच ‘रेगे’ चित्रपटातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता आरोह वेलणकर आता बॉलिवूडमध्ये नशीब आजमावताना दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी तो ‘बिग बॉस मराठी’मध्ये दिसला होता. आरोहने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बॉलिवूड सिनेविश्वातील पदार्पणाविषयी माहिती दिली आहे.
अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर शूटिंग सेटवरचे फोटो शेअर आरोहने लिहिलंय, ‘सिनेमाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस!!! चांगल्या लोकांची साथी मिळाल्यामुळे मला एका चांगल्या प्रोजेक्टचा भाग होता आलं. माझा हा पहिला हिंदी चित्रपट पुढच्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तोपर्यंत प्रतीक्षा करा…’. या फोटोंवरुन आरोह वेलणकर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान आहेत. एक नवी संधी आणि नव्या भूमिकेसोबत आरोह बॉलिवूडमध्ये एंट्री करताना दिसणार आहे.