हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्राचे आद्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज इतिहासाचे प्रत्येक पान रुपेरी पडद्यावर उलघडले जात आहे. त्यामद्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह त्यांच्या निष्ठावान मावळ्यांच्या यशोगाथा, वीरगाथांचा समावेश आहे. महाराजांच्या प्रत्येक मावळ्याने स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे आणि यामध्ये नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचाही समावेश आहे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे शिवचरित्राच्या महाग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान आहे! इतिहासाशी त्यांचा असलेला संबंध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याची हळवा कोपरा आहे.
सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भावनिक आणि कौटुंबिक आयुष्यातील घडामोडी अन त्यांच्या शौर्याचे पराक्रमी पान उलगडणारा ‘सुभेदार’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटातील मालुसरे कुटुंबाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये मालुसरे यांचं संपूर्ण कुटुंब पहायला मिळतंय. ज्यात त्यांची आई, पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि कायम खंबीर साथ देणारे शेलारमामा दिसत आहेत.
या पोस्टरमध्ये सुभेदारांच्या भूमिकेत अभिनेता अजय पूरकर, तर सुभेदाराच्या पत्नीची म्हणजेच सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे साकारताना दिसणार आहेत. धाकटा भाऊ सूर्याजी मालुसरेंच्या भूमिकेत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसतोय. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच यशोदा बाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारताना दिसतेआहे. तसेच मालुसरे या कुटुंबीयांच्या पाठीशी कायम असणारे त्यांना आधारवड असणारे शेलार मामा यांच्या भूमिकेत अभिनेता समीर धर्माधिकारी दिसत आहेत. ‘सुभेदार’ हा चित्रपट ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत मोहीम फत्ते करणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावरचं नव्हे तर त्यांना मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या कुटुंबावर देखील आधारित आहे.