ग्रहमख, हळदी, संगीत..!! ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेता लग्नबंधनात अडकणार; विधीचे फोटो झाले व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. गेल्या महिन्यात अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख लग्नबंधनात अडकले. यानंतर अलीकडेच अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री सुरुची अडारकर यांनी लग्न केलं. शिवाय अभिनेता विनम्र भाबलदेखील बोहल्यावर चढला. तसेच येत्या काळात अभिनेत्री स्वानंदी टिकेकर – गायक आशीष कुलकर्णी, ‘गायिका मुग्धा वैशंपायन – गायक प्रथमेश लघाटे, ‘अभिनेता शुभंकर एकबोटे – अमृता बने लवकरच लग्न करणार आहेत. यामध्ये आणखी एका अभिनेत्याच्या नावाचा समावेश होत आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘तू चालं पुढं’ या मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता ध्रुव दातार आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेत त्याने निगेटिव्ह भूमिका साकारली आहे. शिल्पीचा खास मित्र विक्रमची भूमिका साकारणारा हा गुणी कलाकार आता खऱ्या आयुष्यात नवरोबाची भूमिका साकारायला सज्ज झाला आहे. माहितीनुसार, ध्रुव दातार कोरिओग्राफर अक्षता तिखेसोबत लग्न गाठ बांधणार आहे. १४ मे २०२३ रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला होता.

अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडल्यानंतर आता ६- ७ महिन्यानंतर त्यांचं लग्न होणार आहे. सध्या ध्रुव आणि अक्षताच्या घरी लगीनघाई सुरु आहे. दोघांच्याही घरी त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकताच ध्रुवचा ग्रहमख, हळदी, केळवण आणि संगीत सोहळा पार पडला आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स करीत अभिनेत्याच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.