‘माझ्या अळनी भावांनो, थंड घ्या..’; किरण मानेंची ‘ती’ खरमरीत पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. टीव्ही मालिका त्यानंतर बिग बॉस मराठीसारखा रिऍलिटी शो आणि आता चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमात किरण माने झळकले आहेत. त्यांचा ग्रामीण भागात विशेष चाहता वर्ग आहे आणि त्यांची स्वतःची नाळ गावच्या मातीशी जोडलेली असल्यामुळे ते कायम गावाकडच्या गोष्टी करताना दिसतात. आताही त्यांनी अशीच एक खरमरीत पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘…मराठी मानूस अमेरीकेत र्‍हानारा असो नायतर मुंबैसारख्या मेट्रोशिटीत… त्यो अस्सल गांवाकडचा हाय, हे तुमी कसं वळखाल..? समजा तुमचं नांव ‘प्रकाश’ हाय. त्याची तुमच्याशी मैत्री झाली. काळजाच्या जवळ जागा मिळाली, की लगीच आपसूक तुमाला त्यो हाक मारनार ‘ए पक्याS’! गांवाकडच्या मानसानं आपल्या नांवाचा असा उल्लेख केला की समजायचं आपन त्याच्या मनात घर केलंय… माझा एक दोस्त एक्साइजमधी कमिशनर हाय, त्याला मी ‘इज्या’ अशी हाक मारतो, त्यो बी मला किरन्या म्हन्तो. आमचा मित्र ‘सोन्या’ सायबर क्राईम डिपार्टमेन्टमधला लै मोठा सायब हाय, तर इश्या स्काॅडलंडमधल्या कंपनीत सीईओ हाय ! पशा इंजिनीयर हाय, राजा डाक्टर हाय, वशा प्राचार्य झालाय, रंज्या साखर कारखान्यावर डायरेक्टर, तर जया आमदार झालाय. या सगळ्या जिगरी दोस्तांनी ‘किरण’ अशी हाक मारली की मला सुरमई खाताना काटा लागल्यागत हुतं… जे अस्सल गांवच्या मातीतले हायेत त्यांना ठावं आसंल, वडिलांना ‘म्हातारं’ म्हनायची रीत हाय’.

‘आम्ही काॅलेजमधी असताना आमचे फिजीक्सचे डुबल सर दिलीप कुमारचे फॅन होते, ते आमाला म्हनायचे, “काय बच्चन बच्चन करताय… आमचा दिलप्या बाप होता त्याचा. दाग बघा, नया दौर बघा…तोडलंय वाघानं.” मला वारकरी संप्रदायाचा लै लळा. आपली संतमंडळी लाडक्या इठूरायाला ‘इठ्या’ म्हनायची… “ज्ञानीयाचा वा तुक्याचा.. तोच माझा वंश आहे.” तुकाराम महाराजांना तुक्या म्हन्ल्यावर आमाला तुकोबारायांच्या लेकरांना राग येत नाय… उलट माया वाढती. डाॅ. आंबेडकरांना कुनी ‘माझा भिमा’ म्हन्लं की माझं काळीज फुलुन येतं. शहरी, सपक, अति मिळमिळीतपनानं, पुर्वापार चालत आलेल्या ग्रामीन मोकळ्याढाकळ्या वागन्याची ठरवून माती केलीय… ग्रामीण सोगळ्या वागन्या- बोलन्याला कमी लेखलंय… त्यात आपली खेड्यातनं शहरात गेलेली बांडगुळंबी सामील व्हत्यात. आता ह्या येड्या टाळक्यांना शाहरूख खानला आमी ‘शारख्या’ का म्हन्तो ते कसं कळनार..?’

‘…तीस वर्ष झाली या गोष्टीला. काॅलेजला दांडी मारून, सातार्‍यातल्या ‘कृष्णा’ टाॅकीजला ‘कभी हा कभी ना’ बघायला बसलोवतो. मी, पश्या, शाम्या, राजा आन् दिप्या… जसा ‘दिवाSSSनाS दिल दिवानाSS’ म्हनत आपला भाऊ आला… आमी पाचहीजन एका सुरात वराडलो, “शारख्या आला रेSSSSS”… टाळ्यांनी थिएटर हादरवलं. शाम्यानं पडद्याजवळ जाऊन शिट्ट्या मारल्यावत्या.. तवापास्नं त्यो आमचा ‘शारख्या’च हाय. तवा माझ्या अळनी भावांनो, थंड घ्या. मी केलेल्या पोश्टींवर बातमी करताना न्यूज पोर्टल्सबी हेडलाईनमध्ये ‘शारख्या’ लिहायला लागल्यात, तिथं तुमची काय कथा? त्यो आमच्यासाठी कायम शारख्याच र्‍हानार. लब्यू शारख्या’. किरण मानेंची ही पोस्ट नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.