‘रस्त्यावर एकही लहान मुलाला भीक मागताना…’; गौरव मोरेच्या ‘त्या’ वक्तव्यावर कौतुकाचा वर्षाव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला हास्यवीर अभिनेता गौरव मोरे प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. आपल्या कमाल कॉमिक अंदाजाने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा तर गौऱ्याचा फेमस डायलॉग ज्याच्या प्रेक्षक प्रेमात आहेत. या कार्यक्रमातून त्याला ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ अशी ओळख मिळाली आहे. गौरव अलीकडेच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य प्रचंड चर्चेत आलं आहे.

‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाला असताना गौरवने आपल्या कारकिर्दीबाबत बरेच खुलासे केले. यामध्ये भार्गवीने त्याच्यासोबत रॅपिड फायरदेखील खेळला. दरम्यान तिने गौरवला अनेक वैयक्तिक प्रश्नसुद्धा विचारले. या खेळात भार्गवीने गौरवला विचारलं, ‘जर तुला सुपर पॉवर दिली तर एखादी कोणती गोष्ट करायला आवडेल..?’ यावर उत्तर देताना गौरव म्हणाला कि, ‘अगदी प्रामाणिकपणे सांगू. सगळ्यांना वाटले मी स्क्रीनसमोर बसलोय म्हणून मुद्दाम बोलतोय. मी रस्त्यावर एकही लहान मुलाला भीक मागताना दिसू देणार नाही’.

इतकेच नव्हे तर पुढे म्हणाला कि, ‘मी एकही गरीब माणूस दिसू देणार नाही. मी सगळ्यांना गायब करेन. गायब म्हणजे चांगलं आयुष्य त्यांना देईन. मागे पण एका मुलाखतीमध्ये मी बोललो होता. मला ही गोष्ट मनाला खूप लागते. लहान मुलांना बघतो किंवा इतर माणसांना बघतो, जे रस्त्यावरती दिवस काढतात. जर मला जादू मिळाली, तर मी त्या सगळ्यांना श्रीमंत करेन’. गौरवने दिलेलं हे उत्तर चाहत्यांच्या मनाला भावलं असून या वक्तव्यासाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.