‘माझ्या गळ्याभोवती तुझ्या इवल्याश्या हातांची घडी..’; लाडक्या लेकाच्या वाढदिवशी प्रसादची भावनिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून मराठी अभिनेता प्रसाद खांडेकर प्रसिद्धी झोतात आला. आपल्या अभिनय आणि विनोद शैलीच्या बळावर त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. अलीकडेच त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘एकदा येऊन तर बघा’ रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातून प्रसादचा लेक श्लोकने अभिनय विश्वात पदार्पण केले आहे. अशातच श्लोकच्या वाढदिवशी त्याच्या बाबाने म्हणजेच प्रसादने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने श्लोकबरोबरचे काही फोटो शेअर करत भावनिक कॅप्शन लिहिलंय.

हे फोटो शेअऱ करत प्रसादने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Champ. गुंड्या श्लोक 7 वर्षांचा झालास यार.. याच वर्षी “एकदा येऊन तर बघा” या चित्रपटातून तू छोटीशी भूमिका करुन या क्षेत्रात पदार्पण केलं आहेस. दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट व अभिनेता म्हणून तुझाही हा पहिलाच चित्रपट. माझ्या नाटकाचे प्रयोग तुला पुन्हा-पु न्हा पाहायचे असतात आणि फक्त बघत नाहीस, तर आधीच्या प्रयोगात न घेतलेली एखादी एडिशन लगेच पकडतोस, आम्ही विसरलेल्या डायलॉगची पण तू आठवण करून देतोस. मी सकाळी लवकर शूटला निघतो, तेव्हासुद्धा तू झोपलेला असतोस आणि पॅकअप नंतर उशिरा घरी येतो तेव्हासुद्धा तू झोपलेला असतोस. पण त्या झोपेतसुद्धा माझ्या गळ्याभोवती तुझ्या इवल्याश्या हातांची घडी करून आणि पाय अंगावर टाकून जेव्हा घट्ट मिठी मारतोस तेव्हा सगळा थकवा निघून जातो’.

पुढे लिहिलंय, ‘जगातील कुठली ही मसाज- मशीन जेवढं बॉडीला शांत करू शकत नाही तेवढं तुझ्या एका मिठीने साध्य होत. तुझा डान्स करताना त्या ठेक्यावर होणारं तुझं पदलालित्य. डान्स करताना एक्सप्रेशन वर भर दे म्हटलं म्हणून क्षणाक्षणाला तुझे बदलणारे हावभाव. लिपसिंक मॅच करायला तू केलेले प्रयत्न हे सगळं बघताना भारी वाटत. आपल्याला येणारा कॉम्प्लेक्स हा कधीच कोणाला आवडत नाही. पण तुझं इंग्रजी ऐकताना मला येणारा कॉम्प्लेक्स हा खूपच हवाहवासा वाटतो. श्लोक तू तुझ्या बालपणाचा आनंद घे. कारण तुझं लहान असण्याचा घरातील प्रत्येकजण आनंद घेत आहे. बाकी ममा, आई, ममी आई आणि आपलं सगळं कुटुंबाचा तू जीव आहेस. जेवढं ते तुझ्यावर प्रेम करतात त्यापेक्षा तुझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते वर्षानुवर्षे ते अजून वाढू देत. बाकी तुझा बाबा तुझ्याबरोबर आहेच श्लोक तुला खूप खूप प्रेम’. प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकरी तसेच कलाविश्वात कलाकार मंडळी कमेंटच्या माध्यमातून श्लोकला शुभेच्छा देत आहेत.