मनसोक्त हसणारी ‘पारू’.. बिनधास्त जगणारे ‘शिवा’; झी मराठीवर सुरु होणार दोन नव्या मालिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका बंद झाल्या. मालिका बंद होण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिका केवळ कमी टीआरपी असल्याच्या कारणास्तव बंद करण्यात आल्या. अवघ्या काही महिन्यातच या मालिका बंद झाल्यानंतर आता लवकरच ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिका संपणार आहेत. पण या मालिकांची कसर भरून काढायला नव्या २ मालिका सुरु होणार आहेत.

प्रेक्षकांच्या लाडक्या ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. याची माहिती झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ४ डिसेंबर २०२३ रोजी ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘जाऊ बाई गावात’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला. या शोचे सूत्रसंचालन प्रेक्षकांचा लाडका राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी करतोय. या शोला चांगली पसंती मिळत असताना आता लवकरच ‘ड्रामा Juniors’ हा आणखी एक रिअ‍ॅलिटी शो सुरु होणार आहे. अशातच ‘पारू’ आणि ‘शिवा’ या दोन नव्या मालिका देखील लवकरच सुरु होत आहेत.

‘झी मराठी’च्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर या नव्या मालिकांविषयी माहिती देणारा एक आकर्षक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे कि, ‘मनसोक्त हसणारी ”पारू” आणि बिनधास्त जगणारे ”शिवा”… दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी…एक ‘पारू’ आणि दुसरी ‘शिवा’ लवकरच ‘झी मराठी’वर..’. आता नव्या रिअ‍ॅलिटी शोसोबत या दोन नव्या मालिका अर्थात दोन नव्या गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अद्याप या मालिकांमध्ये कोणकोणते कलाकार येणार आहेत..? आणि या मालिकेचे कथानक काय असणार..? हे समोर आलेलं नाही.