हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास..? संसदेतील खासदारांच्या निलंबनावर अभिनेत्रीचा सवाल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसते. कधी मनोरंजन सृष्टीतील महत्वाच्या विषयांवर ती रोखठोक बोलते. तर कधी समाजातील गंभीर मुद्दे थेट मांडताना दिसते. इतकेच काय तर अनेकदा राजकीय विषयांवर देखील ती परखडपणे आपले मत मांडताना दिसते. आताही तेजस्विनीने अशाच एका विषयावर शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नव्या संसदभवनाच्या सुरक्षाभंगाच्या मुद्द्यावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजताना दिसतंय. संसदेच्या सुरक्षा प्रश्नावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवेदन द्यावं, अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी गोंधळ घातला. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या या विरोधी पक्षाच्या ४९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून गेल्या ३ दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

खासदारांच्या निलंबनानंतर तेजस्विनी पंडितने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तेजस्विनीने लिहिलं आहे कि, ‘चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही…! लोकशाही बसली धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास..?’ या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्री तेजस्विनी पंडितने उदय कि अंत..? असा सवाल उपस्थित केला आहे. तेजस्विनीने खासदारांच्या निलंबनानंतर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.