नांदा सौख्य भरे!! थाटामाटात पार पडला मुग्धा- प्रथमेशचा पारंपरिक विवाहसोहळा; पहा फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धी झोतात आलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन अखेर २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर आता मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटेची झाली. खऱ्या आयुष्यात त्यांनी एकमेकांना जोडीदार म्हणून निवडलं आणि आपल्या नात्याला अधिकृत नाव दिलं आहे. प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांनी चिपळूणमध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाआधीच्या विधींचे कार्यक्रम पार पडले. ज्याचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या स्टोरीवर त्यांच्या लग्न सोहळ्यातील काही विशेष क्षण पहायला मिळत आहेत. ज्यामध्ये लग्नासाठी मुग्धा आणि प्रथमेशने वेगवेगळे लूक केल्याचे पहायला मिळाले. यावेळी त्यांच्या पारंपरिक लूकने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

लग्नविधी दरम्यान मुग्धा वैशंपायनने हिरव्या काठाची पिवळी नऊवारी नेसली होती. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत होती. तर, प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता, पिवळ्या रंगाचं उपरणं आणि पुणेरी पगडी घातली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे दोघांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. नातेवाईक, कुटुंबीय, मित्र मंडळींच्या उपस्थितीत मुग्धा आणि प्रथमेश विवाहबद्ध झाले. या जोडप्याचे लग्नातील फोटो व्हायरल होऊ लागले आहेत आणि यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.