विशाल निकमचं नशीब फळफळलं; आगामी चित्रपटात साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांच्या अत्यंत लोकप्रिय ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या मराठी सीजनचे तिसरे पर्व तुफान गाजले. अभिनेता विशाल निकम हा या पर्वाचा विजेता ठरला आणि चांगलाच प्रसिद्धी झोतात आला. आपल्या वागणुकीने, संस्कारांनी आणि दमदार खेळाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. यानंतर तो काही मालिकांमध्ये दिसला. पण आता लवकरच विशाल ऐतिहासिक चित्रपटामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे समोर आले आहे. नुकताच त्याने आगामी चित्रपटातील लूक शेअर केला आहे. जो व्हायरल झाला आहे.

अभिनेता विशाल निकमने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये ‘श्वासात राजं.. ध्यासात राजं…’ असे लिहिले आहे. यासोबत नशीबवान, छत्रपती शिवाजी महाराज असेदेखील कॅप्शनध्ये लिहिले आहे. विशाल निकमचा हा लूक पाहून तो लवकरच आगामी चित्रपटात उभ्या महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजत आहे. विशालची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

विशालच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. विशाल निकमचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत कायम उत्सुक असतो. अशातच विशालच्या पदरी इतकी मोठी भूमिका पडल्याने त्याचे चाहते आनंदी झाले आहेत आणि या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. विशाल निकमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई – मायेचं कवच’ या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तसेच तो ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता आहे. याशिवाय तो महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटात देखील महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.