हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनावर जणू जादू केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने केलेली कमाई पाहता मराठी चित्रपटांचे सोनेरी दिवस न संपल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून केदार शिंदे चित्रपटाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी एक खास पोस्ट शेअर करताना दिसले आहेत. आज ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या भव्य यशानंतर केदार शिंदेंनी बायको आणि मुलीचे आभार मानताना अत्यंत भावनिक अशी पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदे यांनी पत्नी बेला आणि लेक सनासोबतच एक फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ‘२०१९ पासून #baipanbhaarideva या सिनेमाचा ध्यास घेतला होता. निर्माता मिळत नव्हता. त्यावेळीच्या कित्येक रात्री डोळ्यात पाणी यायचं. मनात असंख्य विचार. या सगळ्याला handle करण्याचं सामर्थ्य मिळालं ते स्वामींमुळे आणि या दोघींमुळे. आपण creative असतो तेव्हा संसार चालतो तो घरच्या गृहिणीमुळेच. बेला तर दोन जबाबदाऱ्या सांभाळते. घर आणि सिनेमा याची निर्मिती!! घरकी मुर्गी डाल बराबर समजून उपयोगाचं नाही. तो मान सन्मान दिलाच पाहिजे. तीने नेहमी मला धीर देण्याचं काम केलय. बायकांचं मन जाणून घेताना, कित्येक वेळा बायकोचं मन मी विसरून गेलो आहे’.
पुढे लिहलंय, ‘आणि माझी सना.. या सिनेमाच्या project report पासून सगळ्याची जबाबदारी तीने सांभाळली. या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पडेल ते काम करत होती. हा सिनेमा पुर्ण होऊ शकला तो सनामुळे. ६ अभिनेत्रींना मेकअप रूममधून सेटवर आणायचं महत्त्वपुर्ण काम ती करायची. यांच्या गप्पा थांबवून हे करणं किती अवघड आहे! हे इथे लिहून समजणार नाही. महाराष्ट्र शाहीर हा नंतर केलेला सिनेमा. पण त्यात सना confidently भुमिका करू शकली ते या ६ अभिनेत्रींचा अभिनय पाहून! हा प्रवास खडतर होता, तरी आनंददायी होता. आज कोट्यावधी रुपये हा सिनेमा कमावतो आहे. त्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. पण कोट्यावधी रुपयांपेक्षा मोलाची माझी टीम, त्यामुळे हे घडलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय!’