‘गर्जतो आमच्या देही रक्त बिंदू…’; ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्री शिवराज अष्टकमूळे कायम चर्चेत असणारे दिग्पाल लांजेकर लवकरच एका नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट म्हणजे शिवरायांचा छावा. हा चित्रपट शिवराज अष्टकचा भाग नसला तरीही प्रचंड चर्चेत आहे. कारण या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं दुसरं पोस्टर समोर आलं आहे. ज्यामध्ये शिवरायांच्या छाव्याची पहिली झलक दिसली आहे. त्यामुळे चित्रपटातबाबत प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हि भूमिका कोण साकारणार..? याविषयी मोठी चर्चा राहिली आहे. अलीकडेच याचे एक पोस्टर रिलीज झाले. ज्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्यानंतर आता दुसरे पोस्टर रिलीज झाले आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज साकारणाऱ्या अभिनेत्याची झलक दिसतेय. यात मागे सिंह आणि त्यासमोर रुद्रावतारात संभाजी महाराज दिसत आहेत. हे नवे पोस्टर आता सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पोस्टर पाहून तो अभिनेता नेमका कोण आहे..? हे सांगणे अवघड आहे. मात्र, पोस्टर पाहून तो कोण आहे याची उत्सुकता आणखीच दुप्पटीने वाढली आहे.

हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे कि,
‘गर्जतो आमच्या देही
रक्त बिंदू रक्त बिंदू
राजे आले आमचे
आले रौद्र शंभू रौद्र शंभू!! ‘शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!’ यासोबत शिवरायांचा छावा असा हॅशटॅग देखील वापरण्यात आला आहे. माहितीनुसार, या चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदेंचे आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी महत्वाच्या भूमिकेत झळकणार असून हा चित्रपट नव्यावर्षात १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.