‘मी माझा नाही…’; महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समाजाला ज्ञानाच्या ज्योतीने उजळून टाकत समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांनी या ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात ज्योतिरावांच्या भूमिकेत अभिनेता संदीप कुलकर्णी तर सावित्रीमाईंच्या भूमिकेत अभिनेत्री राजश्री देशपांडे दिसत आहेत.

चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान अभिनेता संदीप कुलकर्णी आणि अभिनेत्री राजश्री देशपांडे हे चित्रपटातील त्यांच्या लूकमध्ये दिसले. त्यांच्या लूकने एकंदरच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या टिझर आणि लूक रिव्हिलमुळे आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यानंतर आता प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमूळे चित्रपटाची जोरदार चर्चा झाली आहे. या ट्रेलरमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे अज्ञात पैलू उघड झाले आहेत.

अभिनेता संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह या चित्रपटात गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित- दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ या चित्रपाची संकल्पना राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ यांची आहे. तर प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे चित्रपटाचे निर्माते आणि राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या नव्या वर्षात ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.