रवींद्र महाजनींचा मृत्यू केव्हा झाला..? हाऊसकिपींग करणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीमुळे तपासाला नवे वळण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधन वार्तेने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील तळेगाव आंबी येथे रवींद्र महाजनी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून एकटे भाडेतत्वावर राहत होते. या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिक रहिवाश्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपस केला असता घरात महाजनी मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक अंदाजानुसार, महाजनी यांचे निधन तीन दिवसांपूर्वी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या ठिकाणी हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्या महिलेने रवींद्र महाजनींबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

या सदनिकेत हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्या आदिका वारिंगे यांनी सांगितले कि, ‘मी हाऊसकिपिंगचं काम करते. नेहमी मी त्यांच्याकडून कचरा घ्यायला यायचे. मी मंगळवारी त्यांना कचरा देताना शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर मी त्यांना पाहिलं नाही. ते कचरा देताना माझ्याशी बोलायचे. काल इथे वास येऊ लागला. तेव्हा मला स्वच्छ करायला सांगण्यात आलं. मी तिथे पोहोचल्यावर त्यांच्या घरातून वास येत होता. मी दार वाजवलं पण कोणी दार उघडलं नाही. त्यानंतर मी माझ्या सरांना माहिती दिली’.

पुढे त्यांनी माहिती देताना सांगितले कि, ‘गुरुवारी मी आले होते, पण कचरा बाहेर ठेवलेला नव्हता. त्यामुळे ते झोपले असावेत असं मला वाटलं आणि मी तिथून निघून गेले. कालही त्यांनी दार उघडलं नाही. त्यामुळे मी निघून गेले’. महाजनी यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळे या प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, हाऊसकिपींग करणाऱ्या आदिका वारिंगे यांनी दिलेल्या माहितीचा विचार केला असता, रवींद्र महाजनी यांचा मृत्यू मंगळवारी झालेला असू शकतो. अद्याप तपास सुरु असल्यामुळे ठामपणे काहीही सांगता येणार नाही.