हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आमिर खानची लेक इरा खान लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत येत्या ३ जानेवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. नुपूर मराठमोळा मुलगा असल्यामुळे त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना मराठमोळा टच आहे. ज्यामुळे व्याहीभोजन देखील अगदी मराठमोळ्या पद्धतीने पार पडलं. ज्याचे फोटो इराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानच्या लग्नाआधीच्या विधी आणि सोहळ्यांना सुरुवात झाली असून यामध्ये दोन्ही घरातील कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मंडळींचा समावेश आहे. इरा ही आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. जिचा येत्या 3 जानेवारीला नुपूर शिखरेसोबत विवाह सोहळा पार पडणार आहे. नुकताच त्यांच्या व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. मंगळवारी त्यांच्या प्री- वेडिंग विधींसाठी आयोजित या कार्यक्रमात आमिरची एक्स पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद देखील उपस्थित होते.
इरा खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या कार्यक्रमाला आलेले पाहुणे जेवणाच्या टेबलावर पंगतीत एकत्र जेवताना दिसले. यावेळी पाहुण्यांनी केळीच्या पानावर महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेतला. तर पुढच्या फोटोमध्ये इरा तिच्या मैत्रिणीसोबत दिसली. ज्यात ती लाल रंगाच्या साडीत दिसते आहे. कपाळावर बिंदी आणि सोनेरी झुमके परिधान करत तिने आपला लूक पूर्ण केला होता. इरा खानचा होणार नवरा नुपूर शिखरे एक प्रसिद्ध फिटनेस तज्ञ आणि सल्लागार आहे. सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे.