‘… आणि फडणवीसांनी भाऊ कदमला कडकडून मिठी मारली’; व्हिडीओ होतोय व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’मधून कायम प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा अभिनेता म्हणजे भाऊ कदम. आज भाऊ कदम हे मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. भाऊचा चाहता वर्ग इतका मोठा आहे कि बस्स!! केवळ चला हवा येऊ द्या नव्हे तर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून भाऊ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यामुळे कॉमेडीबद्दल बोलायचं झालं कि आपसूकच भाऊ कदम हे नाव समोर येत.

भाऊचे अनेक राजकारणी व्यक्तींसोबतदेखील चांगले घनिष्ट संबंध आहेत. अशातच भाऊ कदमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊला कडकडून मिठी मारलेली दिसतेय. हा व्हिडीओ अभिनेता भाऊ कदम यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. एका सोहळ्याला भाऊने हजेरी लावली होती आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार प्रवीण दरेकरदेखील या सोहळ्यात सामील झाले होते.

भाऊला पाहताच फडणवीसांनी ‘अरे भाऊ..’ असे म्हणत थेट मिठी मारली. यानंतर पुढे त्यांच्यासोबत फडणवीसांनी फोटोशूटसुद्धा केलं. जाताना ‘काय भाऊ कसे आहात..?’ म्हणत फडणवीसांनी भाऊची विचारपूसदेखील केली. भाऊ जितका प्रेक्षकांमध्ये, कलाकार मंडळींमध्ये लाडका आहे तितकाच नेते मंडळींमध्येदेखील प्रचंड लाडका आहे. सध्या भाऊ कदम ‘चला हवा येऊ द्या’ या रिअॅलिटी शोसोबत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेसोबत ‘करुन गेलो गाव’ या नाटकात अभिनय करत आहेत.