करोना परत आलाय..!! मेघा घाडगेवर रुग्णालयात उपचार सुरु; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘लावणी सम्राज्ञी’ मेघा घाडगेचा मोठा चाहता वर्ग आहे. आजवर तिने अनके कार्यक्रमांमध्ये लावणी सादर करत अदाकारी केली आहे. तर चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. इतकेच नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाल्याने ती आणखीच लोकप्रिय ठरली आहे. शिवाय ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असते. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मेघाची तब्येत बिघडल्याचे समजत आहे.

अभिनेत्री मेघा घाडगेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. मेघाने शेअर केलेली हि पोस्ट व्हिडीओ पोस्ट आहे. या व्हिडिओत तिला पाहून हे स्पष्ट होत आहे तिची तब्येत बिघडली असून ती आजारी आहे. कारण मेघाचा हा व्हिडीओ रुग्णालयातील आहे. या व्हिडिओसोबत मेघाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मेघाने लिहिलंय, ‘बुखार! ३१st येतोय.. किंग करोना परत आलाय.. प्लीज काळजी घ्या! मित्र- मैत्रिणींनो २०२४ या वर्षांत तुम्हाला सुख, समृद्धी लाभो आणि भरभरून यश मिळो!’

माहितीनुसार, अभिनेत्री मेघा घाडगे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. तसं तिने शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून लक्षात येत आहे. काही दिवसांपूर्वी मेघा घाडगेचा वाढदिवस झाला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. पण तेव्हाही अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे या फोटोंमध्ये दिसून आले होते. यानंतर आता मेघाने चाहत्यांना, प्रियजनांना ‘काळजी घ्या…’ म्हणत ‘करोना परत आलाय’ असे म्हटल्याने सगळ्यांनाच धडकी भरली आहे.