हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या हिमाचल प्रदेश, कुल्लू, मनाली यांसारख्या ठिकाणी अतिवृष्टीमूळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी लोक पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे अनेकांच्या अनेक आठवणी या ठिकाणांशी जोडल्या आहेत. अशाच काही आठवणींसह प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वाती देवलने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या गाजलेल्या मालिकेत स्वातीने मिनाक्षी वहिनी हे पात्र साकारले होते. तर तिचा पती तुषार देवल हा ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात संगीत देताना दिसतो.
अभिनेत्री स्वाती देवलने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने आपण काही आठवड्यांपूर्वी कुटुंबासोबत हिमाचल, शिमला, कुल्लू येथे फिरायला गेल्याचे तिने सांगितले. सोबतच आताच्या पूरजन्य परिस्थितीवर तिने हळहळ व्यक्त केली आहे. स्वातीने लिहिलं, ‘आहे…. या शब्दात वर्तमान जीव, प्राण, अर्थ आहे… पण ‘होतं’ यात भूतकाळ… मागच्याच महिन्यात अगदी २ आठवडे तर झालेत फक्त… हिमाचल, शिमला, सिस्सू, कुल्लू आणि मनिकरण पाहिलं… आणि टीव्हीवर त्याच रस्त्यांची, वसाहतींची वाताहत पाहून मन भरुन आलं’.
पुढे, ‘ज्या रस्त्यांवर उभं राहून तिथल्या सौंदर्याला मनात, फोटोत कैद केले त्याची फार दुरवस्था झाली आहे. किंबहुना फक्त खुणा राहिल्या आहेत. ज्या गुरुद्वाराच्या पुलावर उभे राहून फोटो काढले. तोच वाहून गेला… संपलं क्षणात..? मन खिन्न झालं… ज्यांचं नुकसान झालं, त्यांना देव पुन्हा उभारण्याची हिंमत देवो. त्या ट्रीपमध्ये आमच्यारोबर असणाऱ्या ड्रायव्हरचं घर हिमालयमध्ये आहे. त्यांची चौकशी केली…ते बरे आहेत कळल्यावर थोडं बरं वाटलं’. स्वातीने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत राहिली. या पोस्टमध्ये तिने व्यक्त केलेल्या भावना अनेकांच्या मनाला भिडल्या आहेत. या पोस्टसोबत तिने तिच्या कुटुंबासोबतच्या ट्रीपचे अनेक फोटोही शेअर केले होते. तसेच तिने व्हिडीओही शेअर केल्याचे पहायला मिळाले.