फुलांच्या पायघड्या, औक्षण, उखाणे..!! प्रथमेशच्या घरी मुग्धाचा ‘असा’ झाला गृहप्रवेश; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच १० दिवसांपूर्वी २१ डिसेंबर २०२३ रोजी गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांचा विवाहसोहळा पार पडला. चिपळूण येथे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत मुग्धा आणि प्रथमेश लग्न बंधनात अडकले. अत्यंत साध्या मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने आणि कोणतीही भपकेबाजी न करता त्यांचा हा विवाह सोहळा पार पडला. याचे कौतुक प्रत्येक नेटकऱ्याने केले. यानंतर आता मुग्धाने सोशल मीडियावर तिच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मुग्धा- प्रथमेशच्या लग्नाचे बरेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मुग्धाच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर आला आहे. कोकणातील परंपरेनुसार मुग्धाचा गृहप्रवेश पार पडल्याचे यात आपण पाहू शकतो. लघाटे कुटुंबीयांनी नव्या सुनेच्या स्वागतासाठी फुलाच्या पायघड्या, तोरणं, रांगोळी अशी सजावट केली होती. तर उंबरठ्यावर प्रथमेशच्या बहिणीने त्यांचं दार अडवत दोघांनाही उखाणा घ्यायला लावला. गृहप्रवेशावेळी उखाणा घेताना प्रथमेश म्हणाला, ‘कपात ओतला चहा, चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय बाकी सगळ्या मारक्या म्हशी’. त्याचा उखाणा ऐकून सगळेच हसू लागले.

यानंतर मुग्धा उखाणा घेत म्हणाली, ‘मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर अन् माहेरची खूण प्रथमेशचं नाव घेऊन कलाश्रीमध्ये प्रवेश करते नीना आणि उमेश लघाटे यांची सून!’. यानंतर माप ओलांडून मुग्धा गृहप्रवेश करताना दिसते. पुढे हे जोडपे देवघरात देवाचे आशीर्वाद घेताना दिसले. या व्हिडीओमागे ‘वेड’ चित्रपटातील ‘सुख कळले…’ हे गाणं लावण्यात आलं आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडिओवर प्रथमेश- मुग्धाच्या लग्नातील साधेपणाचे कौतुक केले जात आहे.