प्रसाद ओकने दाखवली नव्या घराची झलक; नेमप्लेटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा त्याच्या अभिनयाइतकाच दिग्दर्शनामुळेदेखील चर्चेत असतो. गेल्या काही वर्षात त्याने स्वतःच्या नावाचा एक ब्रँड तयार केला आहे. प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर’ आणि दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. या वर्षात त्याचा ‘धर्मवीर २’ आणि ‘परिनिर्वाण’ हे चित्रपट येऊ घातले आहेत. दरम्यान त्याने ओसशल मीडियाच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी दिली आहे. २०२४ या नव्या वर्षाची सुरुवात प्रसाद आणि त्याच्या कुटुंबाने नव्या घरातून केली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या नव्या घराची पहिली झलक दाखवली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे. या पोस्टमध्ये प्रसाद ओकचं नवं घर पहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे प्रसादच्या नव्या घराच्या नेमप्लेटने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. प्रवासादरम्यान अनेकदा आपण किलोमीटर लिहिलेला एक पांढरा – पिवळा दगड पाहिला असेल. ज्याला डिस्टेंस इंडिकेटर असे म्हणतात. प्रसादने त्याच्या नव्या घराची नेमप्लेट अशीच काहीशी बनवून घेतली आहे. ज्यावर प्रसादचं आडनाव आणि फ्लॅट नंबर ‘ओक ११०२/ ११०३’ अशाप्रकारे लिहिलेले दिसत आहेत.

अभिनेता प्रसाद ओकने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ओक कुटुंबाच्या नव्या घराचं प्रवेशद्वार पहायला मिळत आहे. ज्यामध्ये प्रसाद ओक, त्याची पत्नी मंजिरी आणि त्यांच्या दोन मुलांसोबत दिसतो आहे. तिघांच्याही चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्याजोगा आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रसाद ओक आणि त्याचे कुटुंब नव्या घरात नवी सुरुवात करत आहेत. प्रसादने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक नेटकरी, चाहते आणि कलाकार मंडळी कमेंटच्या माध्य्मातून शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.