‘माझ्या विरोधात चूकीच्या तक्रारी..’; ‘त्या’ पोस्टमुळे केतकी चितळे पुन्हा चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कायम आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यामूळे चर्चेत येणारी अभिनेत्री केतकी चितळे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. नव्या वर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अशीच एक लक्षवेधी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने केली आहे. यामधून तिने आपल्यावर २ वर्षांपूर्वी कसा अन्याय झाला, कसे खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि ज्यांच्यामुळे हे केलं गेलं त्यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया कशी समोर आलेली नाही याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

या पोस्टमध्ये अभिनेत्री केतकी चितळे म्हणाली कि, ‘नमस्कार मी केतकी चितळे, मी हा व्हिडिओ का करते आहे तर प्रत्येक वर्षी म्हणजे नवीन वर्ष आल्यावर आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात. माझीही एक इच्छा आहे. १४ मे २०२२ साली मला बेकायदेशीर अटक करण्यात आली. तुरुंगात टाकण्यात आले हे सर्वांना माहिती आहे. माझ्याविरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या. माझ्या विरोधात चूकीच्या तक्रारी दाखल केल्या गेल्या. यात जे सेक्शन अस्तित्वातच नाही ते वापरुन माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बरं ज्या तक्रारी नोंदवण्यात आल्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या त्याचे एफआयआरही लिहिले. जे सेक्शन १६अ (आयटी) अस्तित्वातच नाही ते लिहिण्यात आले. या सगळ्यात एक व्यक्ती मला दोनशे ठिकाणी फिरवणार होती. पण ती व्यक्ती फारशी महत्वाची नसल्यामुळे आपण त्याच्याबाबत फारसं काही बोलणार नाही’.

पुढे म्हणाली, ‘या सगळ्यात ज्या व्यक्तीच्या नावामुळे, त्यांचे नाव वापरुन मला तुरुंगात टाकण्यात आले त्या व्यक्तीचे म्हणणे काय आहे, त्या महापुरुषाचे म्हणणे काय आहे, हे ऐकायला आणि जाणून घ्यायला मला आवडेल. याबाबत मी समन्सही पाठवले आहे. कोर्टात येऊन तुमची बाजू मांडा, असे त्यात म्हटले आहे. घाबरायचं कशाला, मांडा की स्वतःचे मत…. असो…. २०२४ मध्ये माझी ही इच्छा पूर्ण होईल का..?’ असे म्हणत केतकीने घडलेल्या प्रकारावर पुन्हा प्रकाश टाकून तिच्या चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.