नवी सुरुवात!! प्रसाद ओकने केली नव्या सिनेमाची घोषणा; पहिला लूक आला समोर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा जितका उत्तम अभिनेता तितकाच उत्तम दिग्दर्शक आहे. त्यामुळे चाहतेसुद्धा प्रसादच्या आगामी प्रोजेक्ट्सची वाट पाहत असतात. गेल्या काही वर्षात प्रसाद ओक म्हणजे एक ब्रँड अशी काहीशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. त्याची प्रसिद्धी रोज नव्याने वाढत आहे. या वर्षात प्रसाद ‘धर्मवीर २’मधून पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता असताना आता त्याने आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे.

अभिनेता प्रसाद ओक सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. ज्यामुळे तो मजेशीर रिल्स, फोटो यांसह त्याच्या आगामी सिनेमांबाबतचे अपडेट देताना दिसतो. २०२३ वर्ष सरतेवेळी प्रसाद ओकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आगामी सिनेमाची माहिती दिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे कि, ‘वर्षाच्या अखेरीस… नवी सुरुवात… नवा चित्रपट ”रीलस्टार”’ या व्हिडिओतील प्रसादचा लूक या सिनेमातील लूक असल्याचे बोलले जात आहे.

या व्हिडिओत प्रसादने निळ्या रंगाची जीन्स, त्यावर टीशर्ट आणि खांद्याला काळी बॅग लावल्याचे दिसत आहेत. व्हिडीओशेवटी प्रसादच्या हातात शूटिंग क्लॅपदेखील दिसत आहे. प्रसादच्या आगामी सिनेमाचे नाव ‘रिलस्टार’ असे आहे. या चित्रपटाची निर्मिती जे फाईव्ह एंटरटेनमेंट इनिशिएटिव्ह फिल्म्स यांची आहे. तर दिग्दर्शन रॉबिन/ सिम्मी करत आहेत. तसेच या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकसोबत भूषण मंजुळे, अनंत महादेवन आणि अभिनेत्री रुचिरा जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या वर्षात प्रसाद ओकचे ‘धर्मवीर २’, ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘परिनिर्वाण’ आणि आता ‘रीलस्टार’ असे बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.