‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कोर्ट ड्रामा; मुक्ताला सईची कस्टडी मिळणार, हर्षवर्धनची खेळी उलटणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अलीकडेच या मालिकेत मुक्ता- सागरचा विवाहसोहळा पहायला मिळाला. लग्नानंतर त्यांच्या संसाराची सुरुवात कोर्टात सईच्या कस्टडीच्या निर्णयाने होताना दिसणार आहे. दरम्यान एक मोठं नाट्य प्रेक्षकांना पहायला मिळेल. कोर्टात सई जरी सावनीची निवड करत असली तरी अखेर कोर्ट तिला तिच्या मुक्ता आईकडे सुपूर्त करणार आहे. सागर मुक्ताचं लग्न झाल्यामुळे सई आपल्याकडेच येणार, असं कोळी कुटुंबाला वाटत असताना कोर्टात काही उलटंच पहायला मिळतं.

सुनावणीआधी मुक्ता- सागरचं लग्न झाल्याचं पाहून सावनीला धक्का बसतो. पण त्यानंतर सुनावणीदरम्यान सईला ‘तुला कोणाबरोबर राहायला आवडेल..?’ असे विचारले असता ती सावनीचं नाव घेते आणि यामुळे कोळी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते. सईच्या निर्णयामागचा विचार कुणालाच लक्षात येत नाही. पण यामुळे सावनी- हर्षवर्धनला जिंकल्याचा आनंद होतो. कारण सईच्या या निर्णयामागे हर्षवर्धनची खेळी असते. कोर्टाच्या सुनावणीपूर्वी तो सईला भीती घालतो कि, ‘तू जन्माला आल्यानंतर तुझी सावनी आई ६ महिन्यातच तुला सोडून गेली. पण आताही तुझ्याबाबतीत असंच घडणार. काही दिवसात तुझी मुक्ता आई तुला कायमची सोडून जाणार आहे. त्यामुळे तुला जर मुक्ता आई त्या घरात राहायला हवी असेल तर तुला सावनी आईचं नाव घ्यावं लागणार. नाहीतर मुक्ता आई तुला सोडून जाईल’. यामुळे सई कोर्टात मुक्ताऐवजी सावनीचं नाव घेते.

सईने निर्णय का बदलला..? कुणी तिच्यावर कोणी दबाव आणला का..? असे अनेक प्रश्न सागर- मुक्ताला पडतात. सईच्या निर्णयानंतर जज त्यांना १५ मिनिटांचा ब्रेक देतात आणि या वेळात हर्षवर्धनाचा डाव उलटतो.ब्रेकनंतर कोर्टाच्या सुनावणीत जज म्हणतात, ‘सगळ्या पुराव्यांची नीट पडताळणी केल्यानंतर कोर्टाने असा निर्णय घेतलाय, सई सागर कोळी ही यापुढे तिच्या आईबरोबर राहिल. मी अजून स्पष्ट करून सांगतो, यापुढे सई सागर कोळी ती तिची आई मुक्ता सागर कोळीबरोबर राहिल’. निर्णय ऐकताच कोळी कुटुंबाला आनंद होतो. सई मुक्ता आई म्हणतं मुक्ताला घट्ट मिठी मारते. पण सईचा निर्णय कसा बदलला..? याबाबत हर्षवर्धन प्रश्नात पडतो. तर १५ मिनिटांच्या ब्रेकमध्ये जज सईला भेटतात आणि यावेळी हर्षवर्धनने सईला भीती घातल्याचे त्यांना समजते. यामुळे जज सईची कस्टडी मुक्ताला देतात.