केतकी माटेगांवकर घेऊन येतेय ॲक्शन, रोमांस अन ड्रामा; ‘अंकुश’मध्ये साकारणार मुख्य भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ घुले ‘अंकुश’ या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे लेखक सह दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर निशांत नाथाराम धापसे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर समोर आले आहे. ज्यातून गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर मुख्य भूमिकेत असल्याचे समजत आहे. शिवाय चित्रपटाचा टिझर देखील रिलीज झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओमकार फिल्म्स क्रिएशन्स निर्मिती संस्थेच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेला ‘अंकुश’ हा बिगबजेट चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या टीजरमध्ये थरारक बॅक ग्राऊंड म्युझिकवर साखळ्या आणि पिस्तुल दिसते. त्यानंतर एक गोळी झाडली जाते. त्याशिवाय पोस्टरवरील केतकी माटेगावकरचे करारी आविर्भावही दिसत असल्याने या चित्रपटात अॅक्शन पॅक्ड थ्रीलर कथानक पहायला मिळणार याची खात्री पटते. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि केजीएफसारख्या चित्रपटांचे अॅक्शन दिग्दर्शक विक्रम मोर, विख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी चित्रपटातील गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शन केले असून चित्रपटातील गाणी परदेशात चित्रित करण्यात आली आहेत.

कला दिग्दर्शन गिरीश कोळपकर यांनी केले आहे. विशाल चव्हाण कार्यकारी निर्माता आहेत. तर चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून पटकथा, संवाद निशांत नाथाराम धापसे आणि नामदेव मुरकुटे यांचे आहेत. शिवाय मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार- महेश या सिनेमाचे संगीत करत आहेत. हिंदी- मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिलेंनी चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे. मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांनी गीतलेखन तर नागराज दिवाकर यांनी छायांकन, तसेच अनेक पुरस्कार प्राप्त संकलक नीलेश गावंड यांनी चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.