‘दादा एक गुडन्यूज आहे’ फेम अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत; ग्रहमख, मेहंदीचे फोटो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी गेल्या काही महिन्यांत लग्न बंधनात अडकली. यामध्ये सुरुची अडारकर- पियुष रानडे, प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायन, गौतमी देशपांडे- स्वानंद तेंडुलकर, सोनल पवार- समीर पालूष्टे, स्वानंदी टिकेकर- आशिष कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे. या लोकप्रिय जोडप्यांचा सुखी संसार सुरु झाल्यांनतर आता आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ फेम अभिनेता ऋषी मनोहर लवकरच लग्न करणार असल्याचे समजत आहे.

‘दादा एक गुड न्यूज आहे’ या भावा बहिणीच्या गोड नात्याची गोष्ट सांगणाऱ्या नाटकामध्ये उमेश कामत, ऋता दुर्गुळे, आरती मोरे आणि ऋषी मनोहर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या नाटकामुळे ऋषी घराघरांत लोकप्रिय झाला आणि आता तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी मे २०२३ मध्ये ऋषी मनोहरचा साखरपुडा पार पडला होता. यानंतर डिसेंबरमध्ये त्याच्या लग्नाआधीच्या विधींपैकी व्याहीभोजनाचा विधी पार पडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

व्याहीभोजनाचा व्हिडीओ शेअर करत ऋषी मनोहरने लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली होती. हा सोहळा पुण्यातील ढेपे वाड्यात मोठ्या थाटामाटात पार पडला होता. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पौर्णिमा गानू मनोहर यांचा मुलगा ऋषी मनोहरच्या हळद, मेहंदी आणि ग्रहमख सोहळ्यातील बरेच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऋषीच्या होणाऱ्या बायकोचं नाव ‘तन्मई’ असून ती प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ असल्याचे समजत आहे. आता चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी उत्सुक आहेत.