‘मुंबई मराठी माणसाच्याच बापाची..’; पुष्कर जोगने मांडलं रोखठोक मत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता पुष्कर जोग हा मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. ज्याने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये कमालीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘जबरदस्त’, ‘मिशन पॉसीबल’, ‘ती & ती’, ‘वेल डन बेबी’, ‘तमाशा LIVE’, ‘व्हिक्टोरिया’ हे त्याचे काही गाजलेले सिनेमे आहेत. याशिवाय पुष्कर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्यामुळे अनेकदा व्यक्त होताना दिसतो. आताही पुष्करने सोशल मीडियावर हेअर केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने फोनवर मराठी न बोलणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

अभिनेता पुष्कर जोगने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने लिहिलं आहे कि, ‘लोन वाले, रियल एस्टेट वाले, इन्शुरन्स वाले, प्लंबर, ड्रायव्हर्स, इलेक्ट्रीशियन, जे जे मला फ़ोन करत आहेत, त्यांनी माझ्याशी मराठीतच बोलावे. नाहीतर जोग बोलतील. मुंबई मराठी माणसाच्याच बापाची आहे. आणि हो.. तुमचा माज तुमच्या घरी किवा तुमच्या स्टेटमधे दाखवायचा.. इथे नाही.. #जोगबोलणार’. पुष्कर जोगची ही आगपाखड करणारी पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

पुष्करची ही पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर हॅशटॅग ‘जोग बोलणार’ याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पुष्कर जोगच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत त्याच्या मराठी भाषेसाठी घेतलेल्या स्टँडबाबत त्याचं कौतुक करण्यात आलं आहे. अभिनेता पुष्कर जागच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच त्याचा आगामी चित्रपट ‘मुसाफिरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट असून येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.