महेश कोठारेंच्या आई अनंतात विलीन; वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 6 महिन्यात हिरावले मातृछत्र


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून विविध बहारदार कलाकृती प्रदान करणाऱ्या महेश कोठारे यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश कोठारे यांच्या आई म्हणजेच ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य- चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे यांचे निधन झाले आहे. शनिवारी १५ जुलै २०२३ रोजी कोठारेंच्या निवासस्थानी जेनमा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. महेश कोठारे यांच्या वडिलांचे ६ महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर आता मातृशोकाने ते कोलमडले आहेत.

माहितीनुसार, शनिवारी १५ जुलै रोजी सायंकाळी सरोज उर्फ जेनमा कोठारे यांच्या पार्थिवावर कांदिवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जेनमा कोठारे यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे आणि नातू प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे अक्षरशः कोलमडून गेले होते. वडिलांच्या निधनाचे दुःख अद्याप सरले देखील नव्हते तोच महेश कोठारे यांच्या आईचे निधन झाले. कोठारे कुटुंबाचा आधारवड गेल्याने संपूर्ण कुटुंब शोकाकुल अवस्थेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आईच्या निधनाची माहिती दिली आहे.

महेश कोठारे यांच्या आई जेनमा कोठारे यांचे मूळ नाव सरोज तळपदे. ‘जेनमा’ हे त्यांचे टोपण नाव असून ते त्यांना त्यांच्या मावस बहिणीने दिले होते. प्रायोगिक रंगभूमीमूळे सरोज आणि महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांची भेट झाली. त्यांनी १९५२ मध्ये विवाह केला. कालांतराने त्यांनी ‘आर्टिस्ट कंबाइन’ नावाची नाट्यनिर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे ते विविध नाटके सादर करत. ‘लग्नाची बेडी’, ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकात जेनमा आणि अंबर कोठारे यांनी एकत्र रंगभूमीवर काम केले होते.