‘हा निर्णय फार विचारपूर्वक..’; ठाकरे गटातील प्रवेशानंतर किरण मानेंची पहिली प्रतिक्रिया


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनयाइतकेच विविध विषयांवर परखडपणे भाष्य करण्यासाठी कायम चर्चेत असतात. मात्र सध्या किरण माने त्यांच्या राजकारणातील तुफानी एंट्रीमुळे चर्चेचा विषय बनले आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडणारे अभिनेते किरण माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

किरण माने यांनी उद्धव ठाकरेंकडून शिवबंधन बांधून घेतानाचा फोटो शेअर करत लिहिलंय, ‘ ”शिव”बंधन आधीपासून मनाशी बांधलेलंच होतं घट्ट… आज मातोश्रीवर बोलावून ते हातात बांधलं… ते ही प्रबोधनकार ठाकरेंच्या तिसर्‍या पिढीतल्या शिलेदारानं… उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी! परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळ मिळेल याची खात्री देतो. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र’. याशिवाय किरण माने यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. हि व्हिडीओ पोस्ट आहे. यामध्ये ‘लोकशाही वाचवण्यासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे’, म्हटले आहे.

सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मी ‘विचारधारा’ कधीच सोडणार नाही… त्यामुळे हा निर्णय फार विचारपूर्वक घेतला आहे. विचार तोच मांडत रहाणार, जो आजवर परिवर्तनाच्या चळवळीत मांडत आलो. फक्त प्लॅटफाॅर्म वेगळा आणि आजच्या काळातला सगळ्यात समर्पक! काळ दिवसेंदिवस भयानक होत चाललाय. बदल घडवायचा असेल तर राजकारणाशिवाय पर्याय नाही. याहून जास्त काही बोलणार नाही. समविचारी मित्रांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रामाणिकपणा ही माझी ताकदही आहे आणि संपत्तीही आहे. त्या बळावर या दोन वर्षात सगळी वादळं झेलुन उभा राहिलोय. खात्री बाळगा, कुठल्याही राजकिय मोहापायी मन, मेंदू आणि धनाबाबतीत कधीही भ्रष्ट होणार नाही’!