‘तुम्ही दिलेला शब्द पाळलात..’; प्रसाद ओकच्या नव्या घरी वास्तुशांती पूजेला CM एकनाथ शिंदेंची हजेरी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद ओक हा मराठी कलाविश्वात लाडका अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. सध्या प्रसाद त्याच्या आगामी चित्रपटांच्या शेड्यूमध्ये व्यस्त आहे. त्याच्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या रिलीजबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान प्रसादने अलीकडेच नव्या वर्षात कुटुंबासोबत नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. नुकतीच त्याच्या नव्या घरात वास्तुशांती पूजा संपन्न झाली. ज्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. याविषयी प्रसादने एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे कि, ‘मुख्यमंत्री साहेब… माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देवून… तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या सोबत बसलात,जेवलात..’.

पुढे लिहिलंय, ‘नीट निरखून आख्खं घर पाहिलंत.. हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनी “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं..!! साहेब…मनःपुर्वक आभार…!!!’ प्रसादची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत नवीन घरासाठी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.