हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक विनोदवीर प्रकाशझोतात आले. यातील काही विनोदवीर केवळ MHJ पुरता मर्यादित राहिले नाहीत तर त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले. याशिवाय काही कलाकार मंडळी अभिनयासह लेखनातही अव्वल काम करत आहेत. यांपैकी एक म्हणजे श्रमेश बेटकर. मजेशीर प्रहसनांमध्ये उत्तम अभिनय सादर करणारा आणि आपल्या लेखणीतून दमदार विषय मांडणारा श्रमेश सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो.
श्रमेश बेटकरने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो हास्यजत्रेतील सहकलाकार अभिनेत्री चेतना भटसोबत नाचताना दिसतोय. श्रमेश आणि चेतना यांनी सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाणे ‘गुलाबी शरारा’वर रील व्हिडीओ बनवला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. टॉप ट्रेंडिंग गाण्यावर चेतना आणि श्रमेश दोघांनीही कमाल डान्स केला आहे. जशाच्या तशा स्टेप्स फॉलो करून त्यांनी डान्सचं टॅलेंटसुद्धा दाखवलं आहे.
श्रमेश आणि चेतना यांचा हा भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘कडक नाचतोस भावा.वेल्डिंग करून टाकलीस शाप’. अन्य एकाने लिहिलंय, ‘चेतनामय श्रम घेतले आहेत नाचायला’. यावर MHJ फेम प्रियदर्शनीने कमेंट करत म्हटलं, ‘चेतू .. श्रमेशपेक्षा जास्त यामध्ये तू आवडलीस..’तर हेमांगी कवीने कमेंट करत म्हटलं, ‘श्रमेश झाला झाला झाला तुझा करिअर!! आता काय बाकी राहिलं..? पण कमाल केलीये दोघांनी’.