वैभव मांगलेंनी बनवले मुलांसाठी टेस्टी पराठे; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ चित्रपटातील शाकाल ते ‘अलबत्या गलबत्या’मधील चेटकीण अशा एकापेक्षा एक सरस भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमातून वैभव मांगले यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मात्र कामात व्यस्त असूनही ते कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी वेळ काढताना दिसतात. नुकताच त्यांचा स्वयंपाक घरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अभिनेता वैभव मांगले जितके उत्तम अभिनेते आहेत तितकेच उत्तम गायक आणि कधी कधी स्वयंपाकीसुद्धा आहेत. अभिनयाइतकीच त्यांना गायनाची आणि विविध पदार्थ बनवण्याची आवड आहे. त्यामुळे अनेकदा धावपळीच्या शेड्युलमधून ते किचनमध्ये चमचा ढवळताना दिसतात. नुकताच त्यांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वैभव मांगले त्यांच्या मुलांसाठी पराठे बनवत असल्याचं पहायला मिळत आहे. सध्या वैभव मांगलेंचा स्वयंपाकघरातील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला त्यांनी ‘पराठा तितुका मेळवावा’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओत त्यांनी रेसिपी सांगताना म्हटले कि, ‘आज मी माझ्या मुलांसाठी पराठे बनवत आहे. तुम्ही याला पनीर लच्छा पराठा देखील म्हणू शकता. या पराठ्याच्या पिठामध्ये मी साखर, दूध, मीठ, बेकिंग पावडर, ४ चमचे दही, कणिक अशी सगळी सामग्री वापरली आहे. या पराठ्यासाठी मी खास बारीक केलेल्या पनीरचं सारण बनवलं आहे. तसेच या सारणात पनीर, गाजर, सिमला मिर्ची, लाल- हिरवी मिर्ची, जिरं या सगळ्या गोष्टी आहेत’. वैभव मांगलेंच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळाली आहे.