‘स्वतःला भाग्यवान मानतो..’; मिलिंद गवळींनी चाहत्यांसोबत शेअर केला ‘तो’ खास प्रसंग


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कामाबाबत अपडेट देताना ते दैनंदिन जीवनातील बरेच अनुभव, किस्से आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. त्यामुळे अभिनयाइतक्याच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टदेखील चर्चेत येत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होताना दिसतेय. अभिनेते मिलिंद गवळी यांनी ‘आई कुठे काय करते’मधील एक सीन शेअर केला आहे. ज्यामध्ये मालिकेतील काही कलाकार आनंदाने नाचत आहेत. या व्हिडीओसोबत मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये त्यांनी लिहिलंय, ‘आयुष्य सुंदर आहे. आपण भाग्यवान आहोत. आज सकाळी आपण झोपेतून उठू शकलो, ही सुद्धा किती मोठी गोष्ट आहे. कारण जगामध्ये असे लाखो लोक आहेत ज्यांनी आजची सकाळ पाहिली नसेल. खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण आज युक्रेन किंवा गाजा स्ट्रिपमध्ये राहत नाही आहोत. आपण भाग्यवान आहोत की आपण हिटलरच्या काळामध्ये ज्यूस म्हणून जर्मनीमध्ये जन्माला नाही आलो. मी स्वतःला भाग्यवान मानतो की मी भारतामध्ये जन्माला, इतक्या सुंदर देशांमध्ये जन्माला आलो, मी नाही आलो जन्माला सोमालिया, बुरंडी, सुदाम अशा देशांमध्ये, जिथे कुपोषित मुलांची संख्या अतिशय जास्त आहे. मी भाग्यवान आहे की इतक्या सुंदर आई- वडिलांच्या पोटी मी जन्माला आलो. ज्यांनी माझं खूप छान पद्धतीने संगोपन केलं. मला चांगलं शिक्षण दिलं. स्वतः कष्ट करून माझा आयुष्य सुखमय करायचा प्रयत्न केला. आयुष्याकडे बघायचा सकारात्मक आणि छान पद्धतीचा दृष्टिकोन त्यांनी मला दिला. मी भाग्यवान आहे की मला माझ्या आवडीचं काम मिळालं आणि त्या कामांमध्ये मला यशही मिळालं. मी भाग्यवान आहे की मला सुदृढ शरीर आणि जिद्दी मन मिळालं. आजही कष्ट करायची ताकत दिली’.

पुढे लिहिलंय, ‘कृतज्ञ, आज बाराशे हून अधिक भाग ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे मला मिळाले आणि अजून ही छान पद्धतीने करायला मिळता आहेत. उत्कृष्ठ लेखन, दिग्दर्शन, निर्मिती तंत्रज्ञ आणि अफलातून सहकलाकारांबरोबर काम करायला मिळतं आहे. स्टार प्रवाह, हॉट स्टार सारखी उत्कृष्ट वाहिनी या वर ते प्रदर्शित होत आहे. या चार वर्षांमध्ये अनिरुद्ध देशमुख या माझ्या भूमिकेसाठी लोकांचं मला भरभरून प्रेम मिळालं आहे. खरंच भाग्यवान आहे मी. काल मी माझ्या वडिलांबरोबर एका ठिकाणी गेलो असताना काही लोक धावत माझ्याजवळ आले माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी, त्यानंतर माझे वडील मला म्हणाले, “माझ्यासारखा पोलीस खात्यात आला असतास आणि डीसीपी म्हणून किंवा कमिशनर म्हणून जरी रिटायर झाला असतास, तरी इतकी लोकप्रियता, प्रसिद्धी आणि लोकांचं इतकं प्रेम मिळालं नसतं.” मी भाग्यवान आहे की मला माझ्या वडिलांकडनं ही अशी पावती मिळाली’.