तेजश्री प्रधानचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार; अभिनेत्रीने शेअर केला डबींग स्टुडिओतील फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून तेजश्रीने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. नुकताच तिचा पंचक हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. याशिवाय स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री साकारत असलेली मुक्ता देखील प्रेक्षकांची लाडकी आहे. यानंतर आता लवकरच तेजश्रीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे या माध्यमातून ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना तिच्या कामाचे अपडेट देखील देताना दिसते. नुकतीच तिने अधिकृत सोशल मिडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत तेजश्री तिच्या नव्या चित्रपटासाठी डबिंग करताना दिसत आहे. या फोटोमध्ये हॅशटॅग तदैव लग्नम रील १ असे लिहिलेले दिसत आहे.

तेजश्रीने ही पोस्ट शेअर करताना अभिनेता सुबोध भावे आणि दिग्दर्शक आनंद गोखले यांना टॅग केली आहे. यावरुन तेजश्रीसोबत या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेही झळकणार असल्याचे समोर आले आहे. तेजश्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास, झी मराठीच्या ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून ती घराघरांत पोहचली. यानंतर ती ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत झळकली.

या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. सध्या तेजश्री स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या लोकप्रिय मालिकेत मुक्ता हे मध्यवर्ती पात्र साकारत आहे. तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे.