नेत्रदीपक!! ‘कसदार अभिनय, अचुक ताल आणि त्यावरील शास्त्रशुध्द नृत्य..’; ‘अरेंगेत्रम्’ने केलं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिध्द ‘भरत कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स्’ची विद्यार्थिनी आणि ‘संगीत नाटक अकादमीच्या’ अध्यक्षा प्रसिध्द गुरु डॉ.संध्या पुरेचा यांची शिष्या कु. सानिका शिंदे यांच्या ‘अरेंगेत्रम’ कार्यक्रमाने रसिकांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. डोळ्यांचे पारणे फेडणारा नेत्रदीपक पदन्यास ह्दयाला भिडणारा कसदार अभिनय, अचुक ताल आणि त्यावरील शास्त्रशुध्द नृत्य पाहून प्रेक्षकांना एका दर्जेदार कार्यक्रमाची अविस्मरणीय अनुभूती मिळाली. अनेक वर्षात असा सुंदर नृत्य अविष्कार पाहिला नसल्याचे मत या क्षेत्रातील तज्ञ गुरुंनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात नटराज व श्रीगणेशाला पुष्पांजली वाहून झाली. त्यानंतर मालिका रागातील गणेश पंचकम् सादर झाली. अलारिपू, जातीस्वरम्, शब्दम् या राग कल्याणी, तोडी व मालिका यावर आधरित नृत्यानंतर अथाना रागातील वर्णम् सादर झाले. भगवान शिवाची आराधना करतांना पंचाक्षरा स्त्रोताने सर्वांची मने जिंकली. रितीगौला रागातील अभिनयपद ‘अजि सोनियाचा दिवस’ आणि भूप रागातील‘ अबीर गुलाल ’ या अभंगाने कार्यक्रमाचा कळस गाठला. गच्च भरलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहातील (चर्चगेट) श्रोत्यांनी वाद्यवृंद व नृत्याशी एकरुप होऊन उभे राहून कु.सानिकाच्या नृत्यासोबत ठेका धरला. तिल्लाना-मंगलम ने कार्यक्रमाची सांगता झाली. अतिशय सरस, परंपरागत वाद्ये असलेला पारंगत वाद्यवृंद आणि तेवढाच दमदार नृत्य अत्यंत समर्पक व आकर्षक नेपथ्य, प्रकाश योजना यांनी श्रोते भारावून गेले.

गुरू डॉ . संध्या पुरेचा यांच मोलाच मार्गदर्शन सानिकाच्या प्रस्तुती करणातून दिसून येत होते. संध्या पुरेचा संगीत नाटक अकादमीच्या अतिशय व्यस्त कार्यातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढून अतिशय प्रेमाने मार्गदर्शन करतात याची प्रचिती आली. या कार्यक्रमासाठी माजी मुख्य सचिव श्री. स्वाधीन क्षत्रीय, श्री संजयकुमार, श्री. मनुकुमार श्रीवास्तव (मुख्य आयुक्त, सेवा हक्क आयोग, मुंबई ) मा.मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव श्री.भूषण गगराणी, राज्य सेवा हक्क आयुक्त श्री.बलदेव सिंग, माजी सांस्कृतिक सचिव श्री.गोविंद स्वरुप, दारुबंदी आयुक्त श्री.विजय सुर्यवंशी यांसह अनेक सनदी व वरिष्ठ अधिकारी रसिक श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.

तसेच भरतनाट्यम नृत्यातील चेन्नई येथील तज्ञ विदुषी डॉ.नंदिनी रमणि, पद्मश्री सुनयना हजारीलाल, डॉ.पद्मा शर्मा, श्री.रविंद्र अतिबुध्दी, श्रीमती माली अग्नेश्र्वरम्, श्रीमती राजश्री ‍शिर्के, श्री.स्वप्नोकल्प दासगुप्ता, शुभदा वराडकर, विनोद हसल, शुभदा केदारी, विजयशंकर, रेणू शर्मा, एम.के.पटेल या भरतनाट्यम, कथ्थक, ओडीसी, नृत्यप्रकारातील ज्येष्ठ गुरुंसोबतच प्रसिध्द तबलावादक अनुराधा पाल, बासरीवादक सुनिलकांत गुप्ता, उद्योजक उल्हास गवळी, पत्रकार / संपादक श्री.अतुल कुलकर्णी, श्री.प्रमोद पवार, लोककला अभ्यासक श्री.प्रकाश खांडगे आदी दिग्गजांची उपस्थिती होती. कु.सानिकाचे वडील ज्येष्ठ सनदी अधिकारी व राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त श्री.दिलीप शिंदे व मातोश्री अभिनेत्री श्रीम.रुपलक्ष्मी शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.